जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे सहकार विभागाचे आदेश
मुंबई : राज्यात कोरोना संकटामुळे सहकारी संस्था आणि जिल्हा बँकेच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश सहकार विभागानं दिले आहेत. कोरोनामुळे अनेक जिल्हा बँकांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. काही जिल्हा बँकांच्या संचालक मंडळाची मुदत संपून १५ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी संपला आहे. सहकार विभागानं कोरोनामुळे ३१ ऑगस्टपर्यंत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुका ३१ ऑगस्टनंतर तातडीने घेण्यात याव्या यासाठी आतापासूनच प्रारुप मतदार याद्या तयार करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. जिल्हा बँकेची प्रारुप मतदार यादी तयार करण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे सहकार विभागाने आताच आदेश काढले आहेत. कोरोनामुळे राज्यातील ३१ पैकी १३ जिल्हा बँकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यात सातारा आणि उस्मानाबाद जिल्हा बँकेचा समावेश आहे.