Top Newsराजकारण

भाजपची विधानभवनाबाहेर प्रतिविधानसभा; सरकारच्या निषेधाचा प्रस्ताव

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याने भाजपाच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. याचा निषेध करण्यासाठी भाजपाने आज विधानसभा सभागृहात न जाता पायऱ्यांवरच प्रतिविधानसभा भरविली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या निषेधाचा प्रस्ताव मांडला आणि त्यावर चर्चा सुरू झाली.

या प्रतिविधानसभेचे कालीदास कोळंबकर अध्यक्ष आहेत. दुसरीकडे विधानसभेत कामकाज सुरु आहे. या महाराष्ट्रात सरकारकडून अन्याय सुरु आहे. फडणवीस यांनी यावेळी काल झालेला प्रकार या अभिरुप विधानसभेच्या अध्यक्षांच्या लक्षात आणून दिला. तसेच सरकारच्या निषेधाचा आणि धिक्काराचा प्रस्ताव मांडला. हे सरकार जुल्मी सरकार आहे. वसुली सरकार आहे. हे भ्रष्टाचारी सरकार आहे. त्याचा आम्हाला पर्दाफाश करायचा आहे, असं फडणवीस म्हणाले. शेतकरी, विद्यार्थी, एमपीएससीचे प्रश्न असतील या प्रश्नांवर आवाज उठविला तर अध्यक्ष महोदय खोट्या आरोपांखाली आमदारांना निलंबित केले जात आहे. जे घडलेच नाही ते आरोप केले जात आहे. यामुळे मी आज या प्रतिसभागृहात मी प्रस्ताव मांडत आहे. यावर चर्चा सुरु करावी, आणि सरकारचा जो काही कारभार सुरु आहे, त्या जुलमी सरकार आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात पर्दाफाश करायचा आहे. ज्या सदस्यांनी तुम्हाला नावे दिली आहेत, त्या सदस्यांना मत मांडण्याची संधी द्यावी अशी विनंती करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी प्रति विधानसभेचे अध्यक्ष कोळंबकर यांच्याकडे केली.

विखे-पाटलांची टीका

या प्रस्तावाला अध्यक्षांनी त्वरित संमती देत विखे पाटलांना पहिले बोलण्याची संधी दिली. अध्यक्ष महोदय आमचे म्हणणे मांडताना मध्येच आम्हाला थांबवू नका, बेल वाजवू नका, असा टोला विखे पाटलांनी लगावला. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम महाराष्ट्र सरकारने केल्याचा आरोप त्यांनी केला. विखे-पाटलांनी सुमारे दहा ते पंधरा मिनिटं भाषण केलं. हे सरकार चर्चेतून पळ काढत आहे. त्यांना जनतेच्या प्रश्नाशी घेणंदेणं नाही. लोकशाहीच्या मंदिरात विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचं काम करण्याचं काम हे सरकार करत आहे, असा आरोप करतानाच विखे-पाटलांनी या सरकारचा निषेध नोंदवला. त्यानंतर जयकुमार गोयल यांनी भाषणाला सुरुवात करत राज्य सरकारच्या निलंबनाच्या कारवाईवर जोरदार टीका केली. त्यानंतर हरिभाऊ बागडे यांनीही या चर्चेत भाग घेऊन सरकारवर सडकून टीका केली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button