‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ला ३७ वर्षे पूर्ण; सुवर्णमंदिरात झळकली भिंद्रानवालेची पोस्टर्स
अमृतसर : सुवर्ण मंदिरामध्ये ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ ही लष्करी कारवाई झाल्याच्या घटनेस यंदा ३७ वर्षे पूर्ण झाली. या कारवाईत मारला गेलेला खलिस्तानवादी जर्नेल भिंद्रानवाले याचे छायाचित्र असलेली पोस्टर्स व खलिस्तानचे ध्वज फुटीरतावाद्यांनी सुवर्णमंदिरात लावल्याने खळबळ माजली आहे.
याआधीही ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या आठवणी जाग्या ठेवत खलिस्तानवाद्यांनी पंजाबमध्ये सातत्याने फुटीरतावादी कारवाया केल्या आहेत. अमृतसरमध्ये शांतता कायम राहावी यासाठी पोलिसांनी हॉल गेट ते हेरिटेज स्ट्रीट या भागात गुरुवारी संचलनही केले होते. खलिस्तानवादी भिंद्रानवाले व त्याचे समर्थक असलेल्या दहशतवाद्यांनी सुवर्णमंदिराचा ताबा घेतला होता. कारवाया रोखण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यू स्टार कारवाई केली.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी गेल्या मार्च महिन्यात सांगितले की, मी खलिस्तानवादी किंवा पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया अजिबात खपवून घेणार नाही. शांतता भंग करण्याचे प्रयत्न हाणून पाडले जातील.