पंढरपूर : आज संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मार्गाचे केवळ भूमिपूजन नाही, तर पंढरपूरकडे जाणारे हे मार्ग भागवत धर्माची पताका आणखी उंचावेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हीसीवरून संवाद साधला. तर पालखी मार्ग भूमिपूजन कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पंढरपुरात दाखल झाले होते. याप्रसंगी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री कपिल पाटील, रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के सिंग, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, भाजपचे प्रदेश्याध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप आमदार खासदार उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. मोदींनी राम कृष्णहरी… राम कृष्णहरी म्हणत कार्यक्रमाची सुरुवात केली. शंकराचार्याने सांगितलं आहे पंढरपूरला आनंदाचंही प्रत्यक्ष स्वरुप आहे. आज त्यात सेवेचा आनंदही मिसळला आहे. मला आनंद होत आहे संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गाचा शुभारंभ होत आहे. वारकऱ्यांना सुविधा मिळणार आहे. पंढरपुराकडे जाणारे हे मार्ग भागवत धर्माची पताका आणखी उंचावेल, असं मोदी म्हणाले.
Addressing a programme on infra modernisation in Pandharpur. https://t.co/TxqyNOzR1Y
— Narendra Modi (@narendramodi) November 8, 2021
दिंडीत जातपात नसते. भेदाभेद नसतो. सर्व वारकरी गुरुभाऊ आहे. वारकऱ्यांची एकच जात आहे. एकच गोत्रं आहे. ते म्हणजे विठ्ठल गोत्रं आहे. मी जेव्हा सबका साथ, सबका विकास म्हणतो त्याच्यामागे हीच भावना असते. हीच महान परंपरा असते. सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या विकासासाठी प्रेरित करते. पंढरपूरची अभा, अभिव्यक्ती सर्व काही अलौकीक आहे.
Prime Minister Narendra Modi lays foundation stone of four laning of key sections of Sant Dnyaneshawar Maharaj Palkhi Marg and Sant Tukaram Maharaj Palkhi Marg. pic.twitter.com/xWFzZin8dw
— ANI (@ANI) November 8, 2021
आपण म्हणतो ना… माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिवरी. माझं पहिलं नातं गुजरातच्या द्वारकाशी आहे. माझं दुसरं नातं काशीशी आहे. मी काशीचा रहिवासी आहे. आणि आपल्यासाठी पंढरपूर ही दुसरी काशी आहे. या भूमीत आजही देवाचा वास आहे. सृष्टीची निर्मिती झाली नव्हती तेव्हापासून पंढरपूर अस्तित्वात असल्याचं संत नामदेवांनीही सांगितलं आहे. या भूमीने अनेक संत दिले. युग संत निर्माण केले. या भूमीने भारताला नवं चैतन्य दिलं, ऊर्जा दिली, असंही त्यांनी सांगितलं. भारतात नेहमीच अशा विभूती जन्माला आल्या. त्यांनी देशाला आणि जगालाही मार्गदर्शन केलं.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपले सगळे वारकरी शेतकरी कुटुंबातून येतात. गावातील गरीबांसाठी देशाकडून प्रयत्न केले जातात. सामान्यांच्या जगण्यात मोठा बदल होत आहे. भारताची संस्कृती, राष्ट्रीय एकतेला, भारताच्या आदर्शाला धरतीपूत्रच जिवंत ठेवतो. अन्नदाता समाजाला जोडतो. समाजासाठी जगतो. तुमची प्रगती तर समाजाची प्रगती. आपला अन्नदाता आपल्या उन्नतीचा मोठा आधार आहे. याच भावनेला घेऊन देश पुढे जात आहे.
देशात हेल्थ इन्फ्रास्टक्चरला बळ देण्यासाठी नवे वैद्यकीय महाविद्यालये उभारली जात आहेत. वेलनेस सेंटर उभारले जात आहेत. डिजीटल व्यवस्थांना वाढवण्यात येत आहे. देशात हायवे, वॉटरवेज, रेल्वेरुळ, मेट्रोलाईन, नवे एअरपोर्ट असे मोठे नेटवर्क उभारले जात आहे. देशातील प्रत्येक गावात ऑप्टिकल फायबर पोहोचवण्यासाठी काम केले जात आहे. या साऱ्या योजनांत आणखी गती आणि समन्वय आणण्यासाठी पीएम गतीशक्ती नॅशनल मास्टर प्लॅनची सुरुवात केली जात आहे, असे मोदी यांनी सांगितले.
मला जनतेकडून तिसरा आशीर्वाद हवा आहे. तो आशीर्वाद पंढरपूरसाठी हवा आहे. मी या ठिकाणाला सर्वात स्वच्छ तीर्थस्थळ म्हणून पाहू इच्छितो. हे काम जनतेच्या सहभागातून होईल. स्थानिक लोक स्वच्छतेची कमान त्यांच्याकडे घेतील, तेव्हाच आपण या स्वप्नाला साकार करु शकू. आपल्याला सर्वांच्या सहभागाची गरज आहे, अशीही अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.
भक्तिसागराच्या पाण्याला विठूनामाच्या गजराचा सुंदर नाद : मुख्यमंत्री
पाण्याला खळखळाट असतो, पण या भक्तिसागराच्या पाण्याला विठूनामाच्या गजराचा सुंदर नाद असतो, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वारकऱ्यांचं कौतुक केलंय. पालखी मार्ग भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हीसीवरून संवाद साधला.
मार्गावर असलेले सर्व अडथळे दूर करणं हे आपले कर्तव्य
ते म्हणाले की, नितीनजी आपण पुण्यकाम हाती घेतला आहात, आपण काही राज्य सरकारकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. साहजिकच आहे, ती जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. गेली अनेक वर्ष ऊन, वारा, पाऊस, रस्त्यातील काटे खळगे यांचा विचार न करता आपली परंपरा जोपासणारे आपले वारकरी, त्याच्यातले अनेक साधूसंत यांच्या मार्गावरती असलेले सर्व अडथळे दूर करणं हे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्र सरकारकडून कोणतीही कमी कोणत्याही पावलावर राहून देणार नाही. आम्ही तुमच्या सोबत राहू, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिलंय.
या वारीचं दर्शन मी स्वतः घेतलेलं आहे. काही वर्षांपूर्वी वारीची फोटोग्राफी मी हेलिकॉप्टरमधून केलेली आहे. ते विराट दर्शन मी त्यावेळी पाहिलं, डोळ्यामध्येच मावत नाही, तर कॅमेऱ्याचं सोडाच. अनेक ठिकाणांहून पालख्या येत असतात, या पालख्या म्हणजे जणू काही नद्या सागराकडे वाहत आहेत, असंच ते दृश्य असतं, असंही त्यांनी अधोरेखित केलंय.
शेवटचं मोठं रिंगण असतं ते वाखरीचं, नितीनजी ही गोष्ट अत्यंत चांगली केलीत. वाखरी ते पंढरपूर हा महामार्गसुद्धा मोठा करण्याचा निर्णय घेतलात. हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. कारण सगळ्या नद्या तिकडे येतात आणि तिकडे मोठा भक्तिसागर होतो. भक्तिसागरऐवजी दुसरा शब्द मला तरी सूचत नाही. या पालखीचा थोडा अनुभव मी पायीसुद्धा घेतलेला आहे. आपण वेगळ्या दुनियेत राहतो, पण हा वारकरी समाज त्याच्या पलिकडे गेलेला आहे. त्यांच्याबरोबर थोडा चालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देहभान हरपून म्हणजे काय याचा प्रत्यय तिकडे येतो. पाण्याला खळखळाट असतो, पण या भक्तिसागराच्या पाण्याला विठूनामाच्या गजराचा सुंदर नाद असतो, असंही मुख्यमंत्री म्हणालेत.
जोपर्यंत आपण त्याच्यात असतो, आपणही देहभान हरपून जातो. रस्ते तर चांगले असेलच पाहिजे, पण त्या मार्गावरून आपल्या देशानं आजपर्यंत वाटचाल केलेली आहे. ही वाटचाल पुढे सहजतेने व्हावी, याच्यासाठी आज आपण पुढाकार घेतला. त्याबद्दल खरोखर तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आजपर्यंत आपल्याला वारकरी संप्रदायानं खूप काही दिलेलं आहे. दिशा, संस्कार आणि संस्कृती तर दिलेलीच आहे. गेली अनेक शतकं परकीय आक्रमणं झेलून या वारकरी सांप्रदायाची परंपरा अव्याहतपणे सुरू ठेवली आहे. जे आयुष्यभर पंढरीची वारी करत असतात, त्यांचं मार्गदर्शन लाभणं हे आपलं भाग्य आहे. मोदीजी मी तुम्हाला धन्यवाद देतो, हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, विठूमाऊलीही आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र कोणत्याही पावलावर मागे राहणार नसल्याचाही मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केलाय.