सेन्चुरियन : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाच्या खेळावर टीम इंडियाने वर्चस्व राखलं. भारतीय संघाचा सलामीवीर के.एल. राहुलचे नाबाद शतक आणि मयंक अग्रवालचे झुंजार अर्धशतक यांच्या जोरावर भारताने दिवसअखेर ३ बाद २७२ धावांपर्यंत मजल मारली. चेतेश्वर पुजारा वगळता इतर सर्व फलंदाजांना चांगली सुरूवात मिळाली. पण मयंक आणि कर्णधार विराट कोहलीला मोठी खेळी उभारता आली नाही. आफ्रिकेकडून तीनही बळी लुंगी एन्गीडीने घेतले.
नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णयाला सलामीवीरांनी सार्थ ठरवलं. पहिल्या सत्रात राहुल-मयंक जोडीने ८३ धावांची नाबाद भागीदारी केली. दुसऱ्या सत्रात सुरुवातीलाच मयंकने अर्धशतक पूर्ण केलं. पण लुंगी एन्गीडीच्या गोलंदाजीवर तो पायचीत झाला. त्याला पंचांनी बाद ठरवल्यानंतर सोशल मीडियावर तो निर्णय वादग्रस्त असल्याचं अनेक चाहत्यांनी लिहिलं. पण मयंकने डीआरएस न घेता परतीचा मार्ग स्वीकारला. मयंक पाठोपाठ पुढच्याच चेंडूवर चेतेश्वर पुजाराला एन्गीडीने झेलबाद केले.
त्यानंतर विराट कोहली राहुलची साथ देण्यास आला. राहुलने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. विराटही पिचवर सेट झाला होता. पण ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या एका चेंडूवर त्याने बॅट लावली आणि तो झेलबाद झाला. त्यानंतर अनेक दिवस चर्चेत असलेला अजिंक्य रहाणे मैदानात आला. त्याने दिवसाचा खेळ संपेपर्यंत राहुलला उत्तम साथ दिली. राहुलने या दरम्यान आपलं सातवं कसोटी शतक साजरं केलं. पहिला दिवस संपला तेव्हा राहुल १२२ आणि अजिंक्य रहाणे ४० धावांवर खेळत होते.
लोकेश राहुलचे सातवे कसोटी शतक
लोकेश राहुलने २१८ चेंडूत आपलं सातवं कसोटी शतक झळकावलं. कसोटी संघाचे उपकर्णधारपद मिळाल्यानंतर त्याचं हे पहिलं शतक ठरलं. तसंच भारताबाहेरचं हे त्याचं सहावं शतक आहे. राहुलला सामन्याच्या सुरूवातीला एकदा नाबाद ठरवण्यात आलं होतं. त्यावेळी आफ्रिकेने डीआरएसची मागणी केली होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. राहुलने अर्धशतकानंतर एकदा हवेतदेखील फटका मारला होता, पण आफ्रिकन फिल्डरला झेल घेता आला नाही. राहुलला मिळालेल्या जीवदानाचा त्याने योग्य वापर केला आणि आपली खेळी सजवत २१८ चेंडूत शतक साजरं केलं.
विराट कोहली स्वस्तात माघारी
कर्णधार विराट कोहलीचा शतकी खेळीचा दुष्काळ काही अद्याप संपुष्टात आलेला नाही. कारण या सामन्यातही कोहली स्वस्तात बाद झाला. विराट कोहली ३५ धावा करुन माघारी परतला. भारतीय क्रिकेट संघाच्या तिन्ही प्रकारात नेतृत्त्व करत असल्यामुळे दबावाचं ओझं वाढल्याचं आणि फलंदाजीकडे अधिक लक्ष देण्यांचा कारण देत कोहलीनं ट्वेन्टी-२० संघाचं नेतृत्त्व सोडलं. त्यानंतर कोहलीला आता एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदाच्या जबाबदारीतूनही मोकळं करण्यात आलं आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या आजच्या खेळीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. कोहलीनं सामन्यात सावध सुरुवात करत मैदानात जम बसवण्याचाही प्रयत्न केला. पण द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गीडीच्या जाळ्यात कोहली फसला आणि कव्हर ड्राइव्ह मारण्याच्या नादात बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका खेळला. यात चेंडू कोहलीच्या बॅटची कडा घेत थेट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या मुल्डरच्या ओंझळीत विसावला आणि कर्णधार कोहलीला बाहेरचा रस्ता धरावा लागला. कोहलीनं ९४ चेंडूत ३५ धावा केल्या. यात ४ चौकारांचा समावेश आहे.