मुंबई: नाना पटोले यांना अमृता फडणवीसांकडून तुमचा उल्लेख ‘नन्हे पटोले’ केला जात असल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला, यावर बोलताना ते म्हणाले की, अमृता फडणवीस आमच्या सुनबाई आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्ही काहीच बोलत नाही, असे सांगत नाना पटोले यांनी या मुद्द्यावर अधिक बोलण्याचे टाळले. दरम्यान, अमृता फडणवीसांच्या ट्विटवर अनेकांनी नाराजी व्यक्त करत, आपण टोकाची राजकीय टिपण्णी करून जनतेचा रोष ओढवून घेऊ नये, समाजोपयोगी कामं करत राहा, राजकीय टिपण्णी करू नये, असा सल्लाही काही नेटकऱ्यांनी दिला.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले आहे. नाना पटोले यांच्यावर अनेकांनी टीका केली. यामध्ये भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचाही समावेश होता. अमृता फडणवीस यांनी ‘नन्हे पटोले’ म्हणत ट्विटरवरून टीका केली होती. याला आता नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अमृता फडणवीसांनी ट्विटवरती नाना पटोले यांना नन्हे पटोले असा उल्लेख करत, काही प्रश्न विचारले. ५०-५० मार्कांचे हे दोन प्रश्न अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडी सरकारमधल्या काही नेत्यांबद्दलचे होते. “थोडक्यात उत्तर द्यावे… ५० मार्क्स; नॉटी नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले ….या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ? रिक्त स्थानो की पूर्ति करो …५० मार्क्स !शराब नही होती ! हरामख़ोर का मतलब है और सुनने में आया है नामर्द है !”, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते.