नवी दिल्ली : कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशात लॉकडाऊन लागणार नाही, पण अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणायची असेल तर स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करुन या आजाराला आळा घालण्याची आवश्यकता असल्याचं मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. देशभरातील ३० राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान जनतेशी संवाद साधत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र आजारी असल्यामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्याऐवजी मोदींच्या उपस्थितीतील या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित राहिले आहे.
कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याची सूचना पंतप्रधानांनी राज्यांना दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, केंद्राने राज्यांना २३ हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्याचा वापर करुन अनेक राज्यांनी आपल्या आरोग्यविषयक सुविधांचा चांगला विकास केला. भविष्यातील आरोग्यविषयक संकटं लक्षात घेता आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा जास्तीत जास्त चांगल्या कराव्यात.
Speaking at meeting with the Chief Ministers. https://t.co/VDA7WeB7UA
— Narendra Modi (@narendramodi) January 13, 2022
होम आयसोलेशनमध्ये जास्तीत जास्त उपचार होणं शक्य आहे. त्यामुळे होम आयसोलेशन संबंधी नियमांचे पालन करावं. ट्रॅकिंग आणि ट्रिटमेंट योग्य पद्धतीने केल्यास रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नाही. आवश्यक असलेल्या औषधांच्या बाबतीत केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी खंबीर उभं आहे, सर्व राज्यांकडे लसीचे डोस उपलब्ध आहेत असंही पंतप्रधान म्हणाले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राज्य सरकारांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी ‘कोरोना विरोधातील लढाईत परिश्रम हा एकमात्र मार्ग आणि विजय हाच एकमात्र पर्याय आहे’, असं मोदी यावेळी म्हणाले.
शंभर वर्षातील सर्वात मोठ्या महामारीविरोधात भारताची लढाई आता तिसऱ्या वर्षात प्रवेश करत आहे. परिश्रम हा आपला एकमात्र मार्ग तर विजय हा एकमात्र पर्याय आहे. आपण १३० कोटी भारताचे लोक, आपल्या प्रयत्नातून कोरोनावर नक्की विजय मिळवू. ओमिक्रॉनबाबत सुरुवातीला जी संशयाची स्थिती होती ती आता कमी होत आहे. सुरुवातीला जे व्हेरियंट होते त्यापेक्षा कितीतरी पट अधिक वेगाने ओमिक्रॉन नागरिकांना संक्रमित करत आहे. आपल्याला सतर्क राहावं लागणार आहे. मात्र पॅनिक होऊन चालणार नाही. आपल्याला हे पाहावं लागणार आहे की सणासुदीच्या काळात लोक आणि प्रशासन अलर्टनेसमध्ये कुठेही कमी पडणार नाही, अशी सूचना मोदींनी सर्व राज्यांना केलीय.
हर घर दस्तक अभियानाला गती देण्याची गरज
फ्रन्टलाईन वर्कर्स आणि सिनियर सिटिझन्सला बुस्टर डोस जेवढ्या लवकर दिला जाईल, तेवढंच आपल्या आरोग्य यंत्रणेचं सामर्थ्य वाढेल. तसंच शत प्रतिशत लसीकरण आणि हर घर दस्तक अभियानाला आपल्याला अजून गती देण्याची गरज असल्याचंही मोदी म्हणाले. सामान्य लोकांचं जीवन, कमीत कमी आर्थिक नुकसान व्हावं आणि आर्थिक व्यवस्थेची गती अबाधित राहो यासाठी रणनिती आखताना हे लक्षात ठेवणं महत्वाचं असल्याचंही मोदी म्हणाले.
महाराष्ट्राकडून कोणत्या प्रमुख मागण्या?
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून पंतप्रधान मोदींकडे महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसींची मागणी केल्याचंही टोपे यांनी सांगितलं.
लसीकरणाबाबत जो काही राष्ट्रीय कार्यक्रम सुरु आहे. त्यात आपण कोव्हॅक्सिन लसीचे ४० लाख डोस आणि कोविशिल्ड लसीचे ५० लाख डोस मागितले आहेत. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि वयोवृद्धांना बुस्टर डोससाठी कोव्हॅक्सिन लस कमी पडत आहे, त्यामुळे केंद्राकडे वाढीव लसीच्या पुरवठ्याची मागणी केल्याचं टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तर काही लोकांचा गैरसमजातून लसीकरणाला विरोध असतो. त्यामुळे केंद्राकडून याबाबत काही नियमावली करता येईल का? अशी विचारणा केल्यांचही टोपे म्हणाले.
‘तर कोरोना चाचणीच्या अनुषंगाने होम किट्स आणि रॅपिड अँटिनेन टेस्ट द्वारे जे लोक पॉझिटिव्ह येत आहेत. त्याची माहिती मिळत नाही. ती बाबही केंद्राच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे ज्या फार्मसी शॉपमध्ये ते विकले जातात त्यांनी त्याबाबत नोंद ठेवावी. अशा रुग्णांना फोन करुन त्यांच्या आरोग्याची चौकशी करता येईल, याबाबत चर्चा केल्याचंही टोपे यांनी सांगितलं.