कठोर निर्बंध लावूनही दिवसभरात कोरोनाचे ६० हजार रुग्ण; राज्यात ३२२ जणांचा मृत्यू
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. पण राज्यातील कोरोनाचा वाढता प्रसार काही थांबण्याचं नाव घेत नाही. आज दिवसभरात राज्यात तब्बल ५९ हजार ९०७ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, तर ३२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ही आतापर्यंतची सर्वाधिक आकडेवारी आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची स्थिती किती विदारक बनत चालली आहे, याचा अंदाज येऊ शकतो.
राज्यात गेल्या 24 तासांत 60 हजाराच्या घरात नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 30 हजार 296 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही आता 5 लाखाच्या वर गेलीय. राज्यात सध्या 5 लाख 1 हजार 559 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नव्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 31 लाख 73 हजार 261 झाली आहे. त्यातील 26 लाख 13 हजार 627 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 56 हजार 652 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबईत दिवसभरात १०४२८ रुग्ण
मुंबईतही आज दिवसभरातील वाढलेला कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 10 हजार 428 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 6 हजार 7 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आज दिवसभरात 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 16 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 14 पुरुष तर 9 महिलांचा समावेश आहे. मुंबई जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांचा दर 80 टक्के झाला आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता 35 दिवसांवर येऊन ठेपलाय. 31 मार्च ते 6 एप्रिल पर्यंत मुंबईतील कोविड वाढीचा दर 1.91 टक्के झाला आहे.
पुण्यात दिवसभरात ४३६१ रुग्ण
पुण्यात आज दिवसभरात 5 हजार 651 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 4 हजार 361 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात आज दिवसभरात 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 13 जण हे पुण्याबाहेरील होते. पुण्यात सध्या 4 लाख 60 हजार 71 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 957 जणांची कोरोना स्थिती चिंताजनक आहे. पुण्यात आतापर्यंत 5 हजार 567 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नागपुरात दिवसभरात ५३३८ रुग्ण
नागपूर जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ आज झाली आहे. गेल्या 24 तासांत 5 हजार 338 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 3 हजार 668 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत नागपूर जिल्ह्यात 66 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्या आकडेवारीसह जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 42 हजार 933 वर पोहोचली आहे.