कोल्हापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका राज्याला बसला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्राचं पावसामुळे मोठं नुकसान झालं. तसेच स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणवार जीवित आणि वित्तहानी देखील झाली. कोल्हापुरात २०१९नंतर पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे हजारो नागरिकांचे संसार पाण्यात वाहून गेले. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला.
उद्धव ठाकरे शाहुपुरीत पूरबाधितांशी आत्मियतेने संवाद साधला. घाबरू नका , काळजी करू नका, असा धीर मुख्यमंत्री पूरग्रस्तांना देत होते. सध्या आपण कोरोनाशी लढतो आहोत. संयम बाळगा. येथील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कुंभारगल्ली व परिसरातील पूरस्थितीवर मार्ग काढू, असंही त्यांनी सांगितलं. तसेच नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, पुराचं भीषण वास्तव जवळून पाहिल्यानंतर त्यासंदर्भातील कामाला, आराखड्याला गती दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूरबाधित क्षेत्रातील तसेच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचेही चांगल्या पद्धतीने पुनर्वसन करण्यावर आमचा भर आहे. हे साध्य करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. नदीपात्रातली अतीक्रमणे, बांधकामांना परवानगी न देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूरबाधित क्षेत्रातील तसेच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचेही चांगल्या पद्धतीने पुनर्वसन करण्यावर आमचा भर आहे. हे साध्य करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. नदीपात्रातली अतिक्रमणे, बांधकामांना परवानगी न देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत.
मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही, तर मी मदत करणारा
महाराष्ट्रावर कोसळलेले हे अस्मानी संकट भयानक आहे. या संकटातून बाहेर पडताना कोविड तसेच पुराच्या पाण्यामुळे होऊ शकणारी रोगराई रोखण्यासाठी साफसफाई करणं, नागरिकांना दिलासा देणं, त्यांचं पुनर्वसन करणं यास आमचं प्राधान्य आहे. हे संकट नेहमीचंच झालं आहे आणि त्यात आमचे संसार वाहून जात आहेत, तेव्हा त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही, तर मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे. मी ह्याच्या आधी देखील सांगितलं आहे की, मी सवंग लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही. पण सगळ्या पूरग्रस्तांना मदत नक्की करेन, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं.