मुंबई : आगामी पोलीस भरती प्रक्रिया स्वतः गृहखातं राबवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सातत्याने समोर येणारे भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेता गृहखात्याने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. आगामी पोलीस भरतीचे अधिकार कोणत्याही एजन्सीला न देता स्वतः गृहखातं ही प्रक्रिया राबवणार आहे. लवकरच राज्यात ७ हजार २०० पोलिसांची भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या भरती प्रक्रियेचे अधिकार प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना मिळणार असल्याची माहिती आहे.
राज्यात लवकरच ७ हजार २०० पोलीसांची भरती होणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलीय. राज्यात ५ हजार २०० पोलीस भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. उमेदवारांची अंतिम यादी लवकरच जाहीर होईल. तर लवकरच पुढच्या टप्प्यातील प्रक्रिया घेतली जाईल, असंही वळसे पाटील म्हणाले आहेत. लेखी परीक्षा झाल्या, शारीरिक चाचण्या झाल्या आहेत. आता या संदर्भातील अंतिम यादी जाहीर करण्याचं काम आहे.
राज्यातील पोलिसांचं बळ कमी आहे. त्यामुळं आम्ही मंत्रिमंडळासमोर पोलिसांची ५० हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती देऊ आणि त्यांसंदर्भात निर्णय घेऊ, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते.