जोकोविकला विम्बल्डनचे ६ वे विजेतेपद; फेडरर, नडालच्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी
लंडन – सर्बियाच्या नोव्हाक जोकोविकने आज झालेल्या विम्बल्डनच्या अंतिम लढतीमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात नोव्हाक जोकोविकने इटलीच्या मॅटेयो बेरेट्टीनीवर मात केली. जोकोविकचे विम्बल्डनमधील हे सलग तिसरे आणि एकूण सहावे विजेतेपद ठरले आहे. तसेच जोकोविकचे हे कारकिर्दीतील एकूण २० वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. त्यामुळे २० ग्रँडस्लॅम विजेतेपदे पटकावणाऱ्या रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या विक्रमाशी जोकोविकने बरोबरी साधली आहे.
आज झालेल्या अंतिम लढतीमध्ये इटलीच्या मॅटेयो बेरेट्टीनी याने नोव्हाक जोकोविकला कडवी टक्कर दिली. पहिल्या सेटमध्ये बेरेट्टीनीने ७-६ अशी बाजी मारत खळबळ उडवली. मात्र सुरुवातीलाच बसलेल्या धक्क्यातून जोकोविकने स्वत:ला सावरले. त्यानंतर पुढच्या सेटमध्ये ६-४ असा विजय मिळवत जोकोविकने लढतीत बरोबरी साधली. मग पुढचे दोन्ही सेट ६-४ आणि ६-३ असे वर्चस्व राखून जिंकत जोकोविकने विजेतेपदावर कब्जा केला. अखेरीस जोकोविकने मॅटेयो बेरेट्टीनीचे आव्हान ७-६, ६-४, ६-४, ६-३ अशा फरकाने परतवून लावत यंदाच्या विम्बल्डन विजेतेपदावर नाव कोरले.