‘जरंडेश्वर’प्रकरणी सातारा जिल्हा बँकेला ‘ईडी’ची नोटीस
सातारा : जरंडेश्वर प्रकरणी ईडीने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस पाठवली आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्जपुरवठा केल्या प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. कारखान्याला दिलेलं ९६ कोटींचं कर्ज कशाच्या आधारावर दिलं? याचा खुलासा करावा असे आदेश ईडीने बँकेला दिले आहेत.
कोरेगाव येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र घाटगे यांचा आहे. दरम्यान, हा कारखाना घेत असताना चार विविध बँकांनी कर्ज पुरवठा केला होता. त्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश आहे. या बँकेने संबंधिताना ९६ कोटी रुपयांचं कर्ज दिलं. त्याच पार्श्वभूमीवर ईडीने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीने नोटीस बजावली आहे. जिल्हा बँकेने कर्ज देताना कोणत्या आधारावर दिलं, कागदपत्रांची पूर्तता नेमकी कशी केली गेली होती, कर्ज प्रकरणाची प्रोसेस नेमकी कशी झाली, ही प्रोसेस होताना नियम आणि अटींचं पालन झालं होतं का? अशा पद्धतीने ईडी तपास करु शकते.
ईडीने नुकतीच जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली होती. या कारखान्याशी संबंधित सर्व कंपन्यांची कसून चौकशी ईडी मार्फत सुरू आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज वाटपाबाबत खुलासा मागविण्यात आला असल्याने राज्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.