फक्त अल्टिमेटम नको, सर्व मराठा संघटनांना सोबत घेत भूमिका मांडण्याची गरज
राधाकृष्ण विखे-पाटलांचा खा. संभाजीराजेंना सल्ला
अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या संदर्भात संभाजीराजे यांनी मांडलेली भूमिका मराठा समाजाच्या हिताची आहे. मात्र, राज्य सरकारला फक्त अल्टिमेटम न देता सर्व मराठा संघटनांना सोबत घेऊन भूमिका मांडण्याची गरज आहे, असा सल्ला भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संभाजीराजे यांना दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. अशावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजीराजे यांनी राज्य सरकारला ३ कायदेशीर पर्याय दिले आहेत. तसंच मराठा समाजासाठी राज्य सरकारने ५ महत्वाच्या गोष्टी कराव्यात अशी मागणी करत त्या ५ गोष्टी संभाजीराजे यांनी सांगितल्या आहेत. त्यावर बोलताना विखे-पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी अपयशी ठरल्यानं केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे. स्वत:चं अपयश झाकण्यासाठी आघाडीचा वेळ खर्ची जात आहे. सरकारमधील मंत्री जी विधानं करत आहेत. त्यावरुन सरकारचा हेतू प्रामाणिक दिसत नाही. सकल मराठा समाजाने एका व्यासपीठावर एकत्र यावं. एकत्रितपणे सरकारवर दबाव आणून आरक्षण आपल्या पदरात पाडून घ्यावं, असं मत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केलंय. संभाजीराजे यांनी नवा पक्ष काढावा किंवा नाही हा त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे. मराठा समाजाने कोणत्याही पक्षाच्या बाजूने आपली भूमिका उभी केली नाही. सर्वांनी एकत्र येऊन भूमिका घ्यावी, असंही विखे-पाटील यांनी म्हटलंय.
या सरकारचा लौकिक फक्त घोषणाबाज सरकार म्हणून आहे. कोविडच्या काळात काम करताना अनेक पत्रकारांना प्राण गमवावे लागले. मंत्र्यांनी अनेकदा मदतीची घोषणा केली मात्र अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. याउलट केंद्राने पाठपुरावा करुन ५ लाखांची मदत दिली. म्युकरमायकोसिस रुग्णांचा उपचाराचा खर्च पाहता राज्य सरकारने योजनेतून दिलेली मदत अत्यल्प आहे. यात इजेक्शनचा खर्चही भागणार नाही. महाविकास आघाडी सरकारची फक्त वाऱ्यावर वरात सुरु आहे, अशा शब्दात विखे-पाटलांनी राज्य सरकारवर टीका केलीय.