मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका करताना सातत्यानं पाहायला मिळतात. आता नाना पटोले यांचा एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हीडिओमध्ये पटोले ‘मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो’ असं बोलताना दिसत आहेत. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोले यांनी या सारवासारव केलीय. मी पंतप्रधान मोदींबाबत नाही तर गावगुंड असलेल्या मोदीबाबत बोललो आहे, असं पटोले म्हणाले.
त्या भागात निवडणुका चालू आहेत. आमच्या भागात मोदी नावाचा एक गावगुंड आहे. त्याची तक्रार गाववाले करत होते. मी त्यांना सांगत होतो की घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे आणि मला कुणाला घाबरण्याची गरज नाही. त्यावर ते वाक्य आहे. पंतप्रधान मोदींबद्दल ते वाक्य नाही. या प्रकरणाचा बाऊ केला जात असेल तर भाग वेगळा आहे. तुम्ही तो व्हीडिओ पाहा, त्यात लोकांच्या तक्रारीनंतर लोकांमध्ये मी बोललो आहे. मी कुठल्या भाषणात मी हे बोललो नाही. गावगुंडाची तक्रार लोक करत होते आणि त्यांना मी आश्वस्त करत होतो. या व्हीडिओत मी पंतप्रधानांचा उल्लेख केला नाही किंवा नरेंद्र असा शब्दही वापरला नाही. मोदी नावाचा गावगुंड आहे, त्याबद्दल मी बोललो आहे, असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिलं आहे.
मी का भांडतो? मी आता मागील ३० वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे…., असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केल्याचं या व्हीडिओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळत आहे.
केवळ शारीरिक उंची असून चालत नाही…; फडणवीसांचं प्रत्युत्तर
पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा ताफा २० मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो… काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही ? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन? नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते!’ असं ट्विट करत फडणवीस यांनी पटोलेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
चंद्रकांत पाटलांचे सर्व जिल्हाध्यक्षांना आदेश
‘नेता तैसा कार्यकर्ता, त्यांचे राष्ट्रीय नेते मध्येच गायब होतात, काहीही बोलतात, परिणाम काय होईल, परंपरा काय त्या मोडल्या जातील याची काळजी करत नाहीत. त्यात त्यांचे अध्यक्ष नाना पटोले वेगळं काय करणार? मी त्यांना भ्रमिष्ट म्हणत नाही, पण भ्रमिष्टासारखं त्यांचं वर्तन सुरु आहे. पंजाबमधील घटनेला ते नौटंकी काय म्हणाले, अमित शाहांवर त्यांनी आरोप केला की त्याचाच हा कट आहे. काय बोलतो, काय अर्थ होतो, याचा काही त्यांना पत्ता नाही. भारतीय जनता पार्टी हे सहन करणार नाही. त्यांनी जेव्हा नौटंकी म्हटलं त्यावेळी आम्ही राज्यभरात केसेस दाखल करण्याचा प्रयत्न झाला. पण कुठल्याही पोलीस ठाण्यात केस दाखल होऊ शकली नाही. राणे साहेबांनी नितेश कुठे आहे हे माहिती असल्याचं वक्तव्य केल्यानंतर पोलीस त्यांच्या घरावर नोटीस लावायला पोहोचले. राणे साहेब म्हणाले असतो तर एक थोबाडीत मारली असती, त्यावर त्यांना अटक केली. पण नाना पटोलेंना हात लावायची हिंमत नाही. कारण काँग्रेस पाठिंबा काढून घेईल. सगळं खुर्चीभोवती सुरु आहे. भाजप हे सहन करणार नाही. आम्ही सगळ्या जिल्हाध्यक्षांना सांगणार आहोत की आपल्या जिल्ह्यात या विषयावर आक्रमक व्हा’, असा आदेश चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे.
प्रवीण दरेकरांचा पलटवार
मला वाटतं अशा प्रकारचा व्हीडिओ असेल आणि पटोले कार्यकर्त्यांशी बोलत असताना असं वक्तव्य केलं असेल तर ते दुर्दैवी आहे. आगामी राजकारणासाठी हे चिंताजनक आहे. खरं म्हणजे नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अशा प्रकारची वक्तव्ये अनेकदा त्यांनी केली आहेत. बोलू शकतो इथपर्यंत ठीक आहे. राजकारणामध्ये आपण वेगवेगळ्या नेत्यांवर टीका करतो, राजकीय टीका असतात, सरकार म्हणून टीका करतो. मात्र, अशा प्रकारचं वक्तव्य भयानक आहे. काँग्रेसला आज जरी देशभरात यश मिळालं नसलं तरी एक वैभवशाली परंपरा असलेला हा पक्ष आहे. अनेक चांगले नेते होऊन गेले आणि आजही आहेत. पण नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपणाचा बालिशपणा मांडून ठेवला आहे की, प्रत्येक आठवड्याला खालच्या पातळीची टीका करणं, बालिश वक्तव्ये करणं आणि आता तर पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. आपण सरकार म्हणून, देशाचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडे पाहत असतो. पण याठिकाणी प्रत्येक गोष्टी राजकारण, तिरस्काराने पाहत असू, आता तरी मारण्याची भाषा होत असेल तर हे लाजिरवाणं आहे, अशा शब्दात दरेकर यांनी पटोलेंना फटकारलं आहे.