ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमारविरोधात अजामीनपात्र वॉरंट

नवी दिल्ली : भारताचा ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशीलकुमार याच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे. त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये झालेल्या एका खुनाच्या घटनेमध्ये दिल्ली पोलीस सुशील कुमारचा शोध घेत आहेत. मात्र, ही घटना उघड झाल्यापासून सुशील कुमार पोलिसांना सापडला नसल्यामुळे त्याच्याविरोधात आधी पोलिसांनी लुकआऊट नोटीस काढली होती. त्यानंतर देखील सुशील कुमारचा शोध न लागल्यामुळे त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे सुशील कुमार सापडताच त्याला अटक होण्याची शक्यता आहे.
दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या आवारात ४ मे रोजी सागर राणा या २३ वर्षीय कुस्तीपटूची हत्या झाली होती. त्या प्रकरणात पोलीस सुशील कुमार याच्यासह इतर आरोपींचा शोध घेत आहेत. छत्रसाल स्टेडियममध्ये आलेले ते आमचे कुस्तीपटू नव्हते. आम्ही त्यासंदर्भात पोलिसांना देखील माहिती दिली आहे. काही अज्ञात लोकांनी आमच्या स्टेडिममध्ये अवैधरीत्या प्रवेश केला आणि आमच्याशी वाद घातला. या घटनेशी आमचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया सुशील कुमारने यासंदर्भात पोलिसांशी बोलताना दिली होती. मात्र, तेव्हापासून सुशील कुमार गायब आहे.
दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या बाहेर ४ मे रोजी सुशील कुमार आणि त्याच्या काही सहकाऱ्यांचा सागर राणा याच्यासोबत वाद झाला. या वादाचं पर्यवसान हाणामारीत झालं. यामध्ये दोन जण जखमी देखील झाले. त्यामध्ये सागरला जास्त मार लागल्यामुळे त्याला रुग्णालायात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मॉडेल टाऊन परिसरातल्या एका फ्लॅटवरून हा वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, सुशील कुमारने वेगळी भूमिका मांडली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने अधिक तपास सुरू केला आहे.