
मुंबई : महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही. उलट सर्वोच्च न्यायालयात तेथील सीमेवरील जी गावे कर्नाटकात गेली आहेत त्यांना पुन्हा महाराष्ट्रात सामील घेण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच सीमाप्रश्न समन्वय मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
महाराष्ट्रातील ४० ग्रामपंचायतींनी आम्हाला कर्नाटकात सामील करा,अशी मागणी केल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केल्याने तेथील नागरिकांमध्ये संभ्रम असल्याची बाब काँग्रेसचे जतचे आमदार विक्रम सावंत यांनी विधानसभेत मांडली. सावंत यांनी आज औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत महाराष्ट्रातील काही गावे कर्नाटकात समावून घेण्यासाठी कर्नाटक सरकारचे प्रयत्न सुरु असल्याकडे लक्ष वेधले. यावर बोलताना भुजबळ यांनी कर्नाटक सीमावर असलेले महाराष्ट्रातील कोणतेही गाव कर्नाटकात जाणार नाही असे निक्षून सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत बेळगावातील तरुणांसोबत उभे राहण्याची गरज असल्याचे सांगितले. बेळगावातील काही युवकांनी नुकतीच आपली भेट घेतली. या भेटीत त्यांनी तेथील भयाण वास्तव आपल्या समोर आणले असून सध्या बेळगावात शेकडो तरुणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली जात आहे. त्यामुळे बेळगावात राहणार्या असंख्य मराठी युवकांवर अन्याय होत असून त्यांच्यासोबत उभे राहणे गरजेचे असल्याचे पवार म्हणाले.याप्रश्नी राज्य सरकारने कर्नाटक सरकारशी चर्चा करुन या युवकांना सोडून देण्याची मागणी केली पाहिजे. जर या युवकांवरील अन्याय दूर केला नाही तर राज्यातील तरुण शांत बसणार नाही, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला.