धनंजयच्या खासगी प्रकरणाचे समर्थन नाही : पंकजा मुंडे
परळी : धनंजय आणि आम्ही एकाच परिवारातील आहोत. कोणाही बाबतीत घडले असते तर मी अशीच वागले असते. राजकीय फायदा, नुकसान हे माझ्या निर्णयावर असेल, हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत, असे उत्तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या दुसऱ्या लग्नाच्या प्रकरणावर दिले आहे.
धनंजय मुंडे यांच्या खासगी प्रकरणावेळी मी मौन बाळगले नाही, असेही पंकजा मुंडे यांनी एका ऑनलाईन वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, मी कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तीक जीवनामध्ये कधीही सार्वजनिक स्टेटमेंट करत नाही किंवा पाठीमागेही बोलत नाही. हे माझे एक तत्व आहे. कोणाही बाबतीत घडले असते तर मी अशीच वागले असते. धनंजय आणि आम्ही एकाच परिवारातील आहोत. त्यांच्या परिवाराची हानी किंवा संकट असेल त्याचा राजकीय फायदा घ्यावा एवढी छोटी मी नाही. राजकीय फायदा, नुकसान हे माझ्या निर्णयावर असेल, हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत.
दुसऱ्याच्या अपयशावर, त्याच्या अडचणींवर मला इमारत बांधायची नाही. धनंजय मुंडेंच्या बाबतीत जे घडले त्यावर मी त्याचे समर्थन करू शकत नाही, हे मी स्पष्ट केले आहे. मी जेव्हा जन्मले तेव्हा मी पहिली स्त्री आहे हे निसर्गाकडून समजले, नंतर मी कोणाची मुलगी आहे, माझ्याकडे काय वारसा आहे ते कळले. त्यामुळे मी माझे मत मांडले. मी त्याचा राजकीय फायदा घेण्याचा उद्देश नाही, भूतकाळातही केले नाही, असे पंकजा यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राला विसरून भविष्यात देशाच्या राजकारणात जाणार का या प्रश्नावर त्यांनी, महाराष्ट्राला मी विसरणार नाही, महाराष्ट्र माझी मातृभूमी आहे, कर्मभूमी आहे. भविष्यकार नसल्याने मला पुढचे काही भाकित करता येणार नाही, असे पंकजा म्हणाल्या.