Top Newsराजकारण

मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही; कोकणातील नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई : तौक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोकण दौरा करत नुकसानीची पाहणी केली. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला तोक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. तौक्ते चक्रीवादळाने नेमके किती नुकसान झाले याबाबतचे पंचनामे पूर्ण होवू द्या, संपूर्ण आढावा घेऊन व्यवस्थित मदत केली जाईल, कुणीही वंचित राहणार नाही असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज म्हटलं आहे.

रत्नागिरी जिल्हयात या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीतआढावा घेतला. यावेळी रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

तौक्ते चक्रीवादळाने जिल्हयातील ५ तालुक्यात मोठया प्रमाणात नुकसान झाले. यात अधिक नुकसान राजापूर व रत्नागिरी तालुक्यात आहे. वादळाचा फटका बसलेल्या सिंधुदूर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्हयांचा पहाणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एक दिवसाच्या दौऱ्यावर होते. याची सुरुवात रत्नागिरी येथील बैठकीने झाली. जिल्हयात चक्रीवादळाने आंबा आणि काजू तसेच नारळाच्या बागांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंचनामा योग्य पध्दतीने करुन नेमेकेपणाने आकडेवारी सह प्रस्ताव सादर करा असे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी या बैठकीनंतर अधिकाऱ्यांशी बोलताना दिले.

या वेळी जिल्हयातील कोव्हीड परिस्थितीचाही आढावा याच बैठकीत घेण्यात आला. रुग्णांना चांगली उपचार सुविधा आपण देत आहोत. सोबतच रुग्णसंख्या प्रामुख्याने मृत्यूचे प्रमाण कमी होईल या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले.दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येईल असे म्हटले जात असले तरी योग्य ती खबरदारी आणि उपाय योजल्याने आपण ती येणारच नाही यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करु असे मुख्यमंत्री म्हणाले.

रत्नागिरी जिल्हयात झालेल्या नुकसनीबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यावेळी सादरीकरण केले. या चक्रीवादळात जिल्हयात 2 जणांचा मृत्यू झाला असून ८ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. मृत पशुधनाची संख्या ११ आहे. जिल्हयात १७ घरे पूर्णत: बाधित झाली असून अंशत: बाधित घरांची संख्या ६७६६ आहे. यात सर्वाधित दापोलीत २२३५ आहेत. रत्नागिरी तालुक्यात १०८४ तर राजापूरातील ८९१ घरांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या गोठयांची जिल्हयातील संख्या ३७० इतकी आहे. वादळात वाऱ्यामुळे १०४२ झाडे झाले पडली. यात सर्वाधिकी ७९२ झाडे राजापूर तालुक्यात पडली. रत्नागिरीत ही संख्या २५० इतकी आहे. चक्रीवादळात ५९ दुकाने व टपऱ्यांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या शाळांची संख्या ५६ आहे. या सर्व शाळा राजापूर तालुक्यातील आहेत. चक्रीवादळाने मोठया प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाले. अंदाजे ११०० शेतकऱ्यांचे या साधारण २५०० हेक्टर इतके नुकसान झाले. यातील ३४३० शेतकऱ्यांच्या ८१०.३० हेक्टरवरील पंचनाम्यांचे काम आजपर्यंत पूर्ण झाले आहे.

चक्रीवादळाचा सर्वाधित फटका विद्युत वितरण कंपनीला बसला. यात १२३९ गावातील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. आतापर्यंत ११७९ गावांचा पुरवठा आता पूर्ववत झाला आहे. बाधित उपकेंद्राची संख्या ५५ व फिडरची संख्या २०६ आहे. याची दुरुस्ती देखील आता पूर्ण झाली आहे. वीज खांबाचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. उच्चदाब वाहिनीचे ४८५ खांब बाधित झाले असून यापैकी १२५ पूर्ववत करण्यात आले. गावागावात पडलेल्या वीज खांबाची संख्या १२३३ इतकी आहे. यातील १३३ खांबांची उभारणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे.

मत्स्य व्यवसायालाही फटका

जिल्हयातील समुद्रकिनाऱ्यावर आश्रयास आलेल्या बोटींपैकी ३ बोटी पूर्णत: तर ६५ बोटींचे अशंत: नुकसान झाले. ७१ जाळयांचेही नुकसान झालेले आहे. अंदाजित नुकसान ९० लाख रुपयांपर्यंत आहे. या चक्रीवादळात जिल्हा परिषदेच्या ३०१ मालमत्ता बाधित झालेल्या आहे. अंदाजे १ कोटी ९८ लाख ८४ हजार पेक्षा जास्त अधिक नुकसान आहे.

मालवणमध्ये काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे

मालवणमध्ये मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, चक्रीवादळ भीषण होते. जे काही नुकसान झाले आहे. केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत देणार आहोतच आणि राज्य सरकार म्हणून आणखी जे काही करता येणं शक्य हवं ते केले जाईल. नुकसानीचा आढावा जवळपास झाला आहे. आम्ही केंद्रानेही अधिकाधिक मदत करावी म्हणून विनंती करीत आहोत. पंतप्रधान संवेदनशील आहेत, आम्हाला राजकारण करायचे नाही, असं ते म्हणाले. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सागरी किनार पट्टीच्या भागात कायमस्वरूपी काही सुविधा उभारणे गरजेचे आहे त्यानुसार केंद्रानेही आम्हाला आवश्यक ती मदत घ्यावी. वारंवार अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान होते त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

तौक्ते चक्रीवादळामुळे मालवण येथे चिवला बीच परिसरात झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज पाहणी केली. तौक्ते चक्रीवादळाची तीव्रता अधिक होती. याचा मोठा फटका किनारपट्टी भागाला बसला आहे. या काळातही शासकीय यंत्रणेने धीरोदात्तपणे काम केले असून त्याबद्दल यंत्रणेस मी धन्यवाद देतो. यामध्ये जनतेचे सहकार्य चांगले मिळाले असल्याचे, मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

तौक्ते वादळामुळे झालेल्या फळबागा, झाडे, महावितरण, घरे अशा नुकसानग्रस्तांचे पंचनामे करुन तत्काळ अहवाल सादर करावा अशी सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. वादळात झालेल्या नुकसानाबरोबरच भूमिगत विद्युत वाहिनी, धूप प्रतिबंधक बंधारे, चिपी विमानतळ याबाबतही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, वादळाची पूर्वसूचना मिळल्याबरोबर यंत्रणा कार्यान्वीत झाली होती. यावेळेला जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. अशाही परिस्थितीत कोविड रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊ दिला नाही. त्याबद्दल धन्यवाद देतो. पंचनामे लवकर संपवून तात्काळ अहवाल पाठवावा, जेणेकरून कुणीही वंचित राहणार नाही, नुकसानग्रस्तांना मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. भूमिगत विद्युत वाहिनी, धूप प्रतिबंधक बंधारे याबाबतही आढावा घेऊन मुख्यमंत्री म्हणाले, जे प्रस्ताव केंद्राकडे आहेत त्याबाबत निश्चित पाठपुरावा केला जाईल. राज्यस्तरावरील प्रस्तावांना मार्गी लावण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button