बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचे छापील आमंत्रण कोणालाही नाही!
आम्हीही हा कार्यक्रम ऑनलाईन बघणार : अनिल परब
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याला कुणाला आमंत्रण आहे की नाही, हे मला माहिती नाही. आम्हीही हा कार्यक्रम ऑनलाईन बघणार आहोत, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचे अनेक दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. यावरुन शिवसेनेवर टीका केली जात आहे. यावर अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसैनिकांसाठी शिवजयंती म्हणजे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची पुजाच आहे. त्यासोबतच आमचे दुसरे दैवत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं ही आज भूमिपूजन होत आहे. त्यामुळे ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. बाळासाहेबांच्या या वास्तूमुळे त्यांचा संपूर्ण इतिहास महाराष्ट्राच्या जनतेलाही कळणार आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. बाळासाहेबांचे भव्य स्मारक होऊ घातलं आहे. हे स्मारक म्हणजे आमच्यासाठी स्मृतिस्थान आहे आणि नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहे, असेही अनिल परब म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचे कुणाला आमंत्रण आहे वा नाही हे माहीत नाही. पण हा कार्यक्रम ऑनलाईन होणार आहे. आम्ही देखील हा कार्यक्रम ऑनलाईनच बघणार आहोत. त्यामुळे कोण काय सांगते त्याला महत्त्व नाही. ज्यांना जे बोलायचे ते बोलू दे, माझ्यासारखा शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांनी घडला आहे. त्यामुळे कोण काय बोलतो त्याला आम्ही महत्त्व देत नाही, असेही अनिल परब यांनी सांगितले.