
नवी दिल्ली : देशात कोरोनाची रुग्णसंख्या आणि त्यापाठोपाठ कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संध्याकाळी देशवासीयांशी संवाद साधताना, देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचं आहे. त्यासाठी सर्वांनी नियम पाळायला हवेत. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. एकमेकांना सहकार्य करून कोरोनाचं हे तुफान उधळून लावू. या संकटाच्या काळात देशवासियांनी पुढे यावं आणि गरजवंतांना मदत करा. समाजाचा पुरुषार्थ आणि सेवाभावनेतून ही लढाई जिंकू शकू. युवकांनी आपल्या भागात छोट्या समित्या बनवाव्या आणि कोरोना नियम पाळण्यासाठी आवाहन करावं. त्यामुळे कर्फ्यू किंवा लॉकडाऊन लावण्याची वेळ सरकारवर येणार नाही, असेही मोदी यांनी म्हटले आहे.
देशातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता पंतप्रधान गेल्या काही दिवसांपासून विविध घटकांशी चर्चा करत आहेत. मोदींची आज लस उत्पादन कंपनीशी चर्चा झाली, त्यानंतर मोदींनी देशाला संबोधित केलं. ते म्हणाले की, माझी तरुणांना विनंती आहे. त्यांनी आपल्या सोसायटी, परिसरात छोटी कमिटी बनवून कोव्हिड नियम लागू करण्यासाठी मदत करावी. आपण तसं केलं तर लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता लागणार नाही. स्वच्छता अभियानसाठी पाचवी ते दहावीच्या बालमित्रांनी खूप मदत केली होती. त्यांनी घरच्यांना आणि लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला होता. आज त्यांना मी विनंती करतो, घरात असं वातावरण तयार करा की, घरातील लोक विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रसारमाध्यामांनीही लोकांना सतर्क करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न आणखी वाढवावे. तसेच लोकांमध्ये भीती आणि अफवा वाढू नये. याची काळजी घ्यायची आहे. आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवलायचं आहे. राज्यांनी शेवटच पर्याय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा. कोरोना विरोधात लढण्यासाठी शिस्तीची गरज आहे. गरज असेल तरच बाहेर पडा. मला आपल्याला विनंती करतो. तुमचं धैर्य आणि साहसामुळे आजच्या परिस्थिती बदलण्यास देश कोणतीही कसर सोडणार नाही. आपलं कटुंब आणि तुम्ही निरोगी राहा, असं मोदी म्हणाले. धैर्य, शिस्त, नियम कायम ठेवून, आताची ही परिस्थिती बदलण्यास मदत होईल, सर्वांनी नियम पाळा, देशाला लॉकडाऊनपासून वाचवण्यासाठी आपण नियम पाळावे, मायक्रो कंटेन्मेंट झोनवर लक्ष केंद्रित करा, असे आवाहन मोदी यांनी केले.
स्वच्छता अभियानात बालकांनी मोठं काम केलं. आता कोरोनाकाळात विनाकाम, विनाकारण घराबाहेर पडू नका. तुमच्यामुळे आम्ही विजय मिळवू शकतो. या संकटकाळात लोकांना जी मदत केली जाते, ती वाढवा. जी भीतीदायक स्थिती आहे ती कमी होईल. अफवा आणि भ्रम पसरण्याला आळा बसेल.
मोदी यांनी देशातील नागरिकांना धीर देतानाच कोरोनासाठी देश पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी देखील माहिती दिली. सर्व फ्रंटलाईन वर्कर्सचं कौतुक करतो. तुम्ही कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील आपला जीव धोक्यात घालून लोकांना वाचवलं होतं. आज तुम्ही पुन्हा या संकटात दिवस-रात्र मेहनत घेत आहात. कठिणात कठीण परिस्थितीत आपण धीर सोडता कामा नये. आपण योग्य दिशेने निर्णय घेतला तरच आपल्याला विजय मिळू शकेल, असं मोदी यावेळी म्हणाले.
देशातील काही राज्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा पडू लागला आहे. महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याविषयी बोलताना “करोना काळात देशाच्या अनेक भागांमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढू लागली आहे. या बाबतीत पूर्ण संवेदनशीलतेने काम केलं जात आहे. सगळ्यांचे प्रयत्न आहेत की प्रत्येक गरजूला ऑक्सिजन मिळायला हवा. ऑक्सिजनचं उत्पादन वाढवण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.
यावेळी करोनाचे रुग्ण वाढताच देशातील औषध निर्मात्या कंपन्यांकडून औषधांची निर्मिती वाढवली आहे. त्याचा वेग अजून वाढवला जात आहे. आज देशातली सगळ्यात स्वस्त व्हॅक्सिन भारतात आहे. यामध्ये आपल्या देशातल्या तज्ज्ञांनी सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा आणि मदत वाढवण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतानं दोन भारतीय लसींच्या मदतीने लसीकरणाला सुरूवात केली. यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्रातल्या गरजू लोकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले गेले, असं म्हणत मोदींनी देशातील संशोधक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचं कौतुक केलं.
प्रयत्न हा आहे की अर्थव्यवस्था आणि रोजीरोटीवर कमीत कमी प्रभाव पडावा असाच सध्या प्रयत्न आहे. १८ वर्षांवरील लोकांना लस उपलब्ध झाल्यामुळे श्रमिकांना लस उपलब्ध होऊ शकेल. राज्य सरकारांनी मजुरांना विश्वास द्यावा की ते जिथे आहेत, तिथेच त्यांनी थांबावं. गेल्या वेळची परिस्थिती आत्तापेक्षा फार वेगळी होती. तेव्हा आपल्याकडे या संकटाशी लढण्यासाठी उपाय नव्हता. देशानं करोनाविरोधात आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने लढा दिला आहे. त्याचं श्रेय तुम्हा सगळ्यांना जातं.
या संकटकाळात अधिकाधिक लोकांनी पुढे यावं आणि देशवासीयांना मदत करावी. युवकांनी आपल्या सोसायटीमध्ये, परिसरात छोट्या छोट्या समित्या तयार करून करोना नियमांचं पालन करण्यासाठी मदत करावी. असं केलं, तर सरकारांना कर्फ्यू किंवा लॉकडाऊन लावण्याची गरजच पडणार नाही.




