Top Newsराजकारण

आता रडायचं नाही, लढायचं! राजीनाम्यांच्या चर्चांदरम्यान अशरफ गनींचे आवाहन

काबुल : अशरफ गनी यांनी आपल्या अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा संदेश रेकॉर्ड केल्याचं सांगण्यात आलं होतं. तसंच तो कोणत्याही क्षणी जारी केला जाणार असल्याचंही म्हटलं होतं. परंतु अशरफ गनी यांच्या संबोधनानंतर यावर पूर्णविराम लागला आहे. ही लढाई तालिबानच्या पक्षात जाताना दिसत होती. तालिबाननं अफगाणिस्तानातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहरावर ताबा मिळवला होता. या पार्श्वभूमीवर अशरफ गनी यांनी सशस्त्र दलांच्या पुनर्बांधणीला प्राधान्य देणार असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्राध्यक्ष म्हणून अस्थिरता, हिंसाचार आणि देशातील नागरिकांचं स्थलांतर रोखण्यावर माझं लक्ष्य आहे, असं गनी जनतेला संबोधित करताना म्हणाले. हत्यांचं प्रमाण वाढण्यापासून रोखणं, २० वर्षांपासून जे मिळवलंय त्याचं नुकसान होण्यापासून वाचवणं, विनाश आणि सतत असलेली अस्थिरता थांबवण्यासाठी अफगाणी लोकांवर जबरदस्ती थोपवण्यात आलेल्या युद्धाला मंजुरी देणार नाही. सध्याच्या स्थितीबाबत स्थानिक नेते आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांसह चर्चा सुरू आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानमधील परिस्थिती अस्थिर होत चालली आहे. अमेरिकन लष्करानं अफगाणिस्तानमधून आपलं सैन्य परत बोलावण्यास सुरूवात केल्यानंतर तालिबाननं पुन्हा एकदा अफगाणिस्तावर ताबा मिळवण्यास सुरूवात केली आहे. तालिबाननं तब्बल ५० टक्के प्रांतीय राजधानींवर ताबा मिळवला आहे. याच दरम्यान, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देशाला संबोधित केलं. अफगाण सरकार आणि तालिबानदरम्यान गेल्या मोठ्या कालावधीपासून सुरू असलेल्या हिंसक संघर्षादरम्यान हे संबोधन हे महत्त्वाचं वळण ठरू शकतं.

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये पुढे जात दक्षिण अफगाणिस्तानातील कंदाहार, हेल्मंडसह आणखी चार शहरे ताब्यात घेतली. गेल्या काही दिवसांपासून तालिबानने अनेक मोठी शहरं ताब्यात घेतल्याने आता काबुलसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. तालिबानी सैन्य राजधानी काबूलकडे कूच करीत असून काही दिवसांमध्ये तालिबान राजधानीचं शहर काबूलही ताब्यात घेईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. कंदाहारवर तालिबानने ताबा मिळवल्याच्या वृत्ताला सरकारी अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button