आरोग्य

‘कोव्हॅक्सिन’ लस घेतलेल्यांना परदेशात ‘नो एन्ट्री’ !

नवी दिल्ली : करोना लसींच्या तुटवड्यामुळे देशातील लसीकरण मोहिमेला फटका बसला असून अनेक राज्यांमध्ये लसीकरण ठप्प झाले आहे. लसीकरणातील ही दिरंगाई आणि संथगती अशीच राहिली तर आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध ३१ मे नंतरही उठण्याची शक्यता दृष्टिक्षेपात नाही. त्याचा परिणाम आर्थिक, व्यापार, उद्योग, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लसीकरण झालेल्या प्रवाशांना युरोपीय देशांमध्ये प्रवेश देण्याबाबत युरोपीय महासंघामध्ये सकारात्मक चर्चा केली जात असली तरी, जागतिक आरोग्य संघटनेत मात्र त्यावर सहमती झालेली नाही. त्यामुळे लसीकरणानंतर परदेशात जाण्यासाठी आणखी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुसरीकडे ‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन लशींच्या यादीत समावेश नसल्यामुळे लसीकरण झाल्यानंतरही ही लस घेतलेल्या भारतीय प्रवाशांना परदेश दौरा करणे तुलनेने अवघड असेल, असेही म्हटले जात आहे.

लसीकरण आणि आंतरराष्ट्रीय प्रवास या मुद्यांसंदर्भात केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण केले. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींना आंतरराष्ट्रीय प्रवास करू देण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. सध्या आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आंतरराष्ट्रीय प्रवासाला परवानगी दिली जात आहे. करोना संसर्ग नसल्याचा अहवाल असेल तरच आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याची मुभा दिली जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या सहमतीनंतर भारतही लसीकरण झालेल्या व्यक्तींच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला परवानगी देण्याचा निर्णय घेईल, असे अगरवाल यांनी स्पष्ट केले.

‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन लशींच्या यादीत समावेश नसल्यामुळे लसीकरण झाल्यानंतरही ही लस घेतलेल्या भारतीय प्रवाशांना परदेश दौरा करणे तुलनेने अवघड असेल, असेही म्हटले जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत कोव्हॅक्सिन लस समाविष्ट करण्यासाठी ‘भारत बायोटेक’ने अर्ज केला आहे. भारतात उत्पादन होत असलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन यादीत आहे. त्याचबरोबर फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन, चिनी बनावटीची ‘सिनोफार्म’ या लसींचाही समावेश आरोग्य संघटनेच्या यादीत आहे.

करोनाच्या उद्रेकानंतर जगभरातील देशांनी आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित केल्या होत्या. भारतानेही आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ मेपर्यंत स्थगित केली आहे. मात्र, ‘वंदे भारत’अंतर्गत भारतीय नागरिकांना देशात परत आणले जात आहे. जर्मनी, अमेरिका आदी काही देशांशी झालेल्या करारानुसार करोनाबाधित नसलेल्या व्यक्तींना प्रवासाची परवानगी दिली जात होती. मात्र, भारतातील दुसऱ्या लाटेमुळे युरोपातील देश, सिंगापूरसारखे पूर्वेकडील देश तसेच अमेरिकेने विमानसेवा बंद केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button