मुंबईत ६२ खासगी रुग्णालयात आजपासून पुन्हा लसीकरण

मुंबई : मुंबईत लसीचा तुटवडा झाल्याने दोन दिवसांपूर्वी १२० पैकी ९० लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद होते. मात्र शनिवारी एक लाख लसीचा साठा पुण्यावरून मुंबईत आल्याने पुन्हा लसीकरण प्रक्रियेला वेग येऊ लागला आहे. मिनी लॉकडाऊन व लसीचा तुटवडा यामुळे खासगी लसीकरण शनिवारी व रविवारी बंद ठेवण्यात आले होते. मात्र सोमवारपासून ७१ पैकी ६२ खासगी लसीकरण केंद्रांवर पुन्हा एकदा लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.
मुंबईत शुक्रवारपासून लसीचा तुटवडा प्रकर्षाने जाणवू लागल्याने त्याचा परिणाम लसीकरणावर झाला होता. मात्र शनिवारी पहाटे लसीचा साठा मुंबईला मिळाल्याने आता लसीकरण जोमाने सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी, मुंबईत महापालिका आणि शासन यांच्यातर्फे ४९ रुग्णालये, जंबो कोविड सेंटर याठिकाणी तर ७१ खासगी रुग्णालयात अशा एकूण १२० ठिकाणी लसीकरण केंद्रं सुरू होती. महापालिका परिसरात दररोज सरासरी ४० ते ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते.
मुंबई महापालिकेला ९ एप्रिल रोजी रात्री उशिरा ९९ हजार लसी आणि १० एप्रिल रोजी १ लाख ३४ हजार ९७० अश्या एकूण २ लाख ३३ हजार ९७० लसींच्या मात्रा मागील दोन दिवसात उपलब्ध झाल्या आहेत. त्यातून खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्रासाठी लस साठा वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे आता या सोमवारपासून नियोजित वेळेत ७१ पैकी लीलावती, बॉम्बे, हिंदुजा, ग्लोबल, गोदरेज, सर्वोदय, व्होकार्ड, कोकीलाबेन, नानावटी, जसलोक आदी ६२ खासगी लसीकरण केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात होणार आहे.