
पुणे: भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी स्वत: समाज माध्यमाद्वारे दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन देखील पाटील यांनी केले आहे.
दोन दिवसांपूर्वीच पाटील यांच्या कन्या अंकिता यांचा निहार ठाकरे यांच्याशी मुंबई येथे विवाह झाला होता. या विवाह समारंभास राज्यातील महत्वाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हर्षवर्धन पाटील यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यामध्ये पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आॅमायक्रोनच्या प्रादुर्भावानंतर कोरोनाच्या रूग्णसंख्येत सातत्याने वाढ होऊ लागली आहे.
भाजप आ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही कोरोनाची लागण
भाजपचे नेते आणि आ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, राधाकृष्ण विखे-पाटील नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित होते. यात विखे-पाटील यांनी सक्रिय पद्धतीनं अधिवेशनात सहभाग घेतला होता. कालच विखे-पाटील यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. यात ते विनामास्क असल्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. विखे-पाटील यांनी कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कर्डिले यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे इतर नेते देखील उपस्थित होते.
आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्यानं मी स्वत: विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयीबद्दल क्षमस्व. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची कोविड चाचणी करुन घ्यावी आणि काळजी घ्यावी, असं ट्विट राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे.




