अनिल देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभय
गृहमंत्र्यांचे काम चांगले, त्यांना बदलण्याचा प्रश्नच नाही : जयंत पाटील
मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख हे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळेच सध्या महाविकास आघाडीत खांदेपालट होणार नाही. सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोणतीही चूक केलेली नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा मागण्याचा प्रश्नच नाही. गृहमंत्री बदलण्याचा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर आलेला नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जयंत पाटील आले होते. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी गृहमंत्री बदलला जाणार नाही असं त्यांनी सांगितलं.
सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांना बदललं जाणार की मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंह यांना हटवलं जाणार? अशी चर्चा सुरू असतानाच जयंत पाटील यांनी हे विधान केलं आहे. अनिल देशमुख यांच्याकडेच गृहमंत्रीपद राहणार आहे. राज्यात कोणतंही खातेबदल होणार नाही. त्यामुळे वावड्या उठवण्याची गरज नाही, असा खुलासा राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना राष्ट्रवादीकडून अभय देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. गृहमंत्रीपदासाठी तुमचं आणि अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तुमच्या नावाला हिरवा कंदीलही दाखविण्यात आला आहे, त्याबाबत तुमची प्रतिक्रिया काय? असं पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावर याला हिरवा कंदील, त्याला हिरवा कंदील असं काही नाही. तुम्हीही या वावड्या उठवू नका, असं पाटील म्हणाले.
चूक केली असेल तर शिक्षा होईलच
वाझे यांना एनआयएने ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर जी शिक्षा व्हायची ती होईल. आधी या प्रकरणाचा एटीएस तपास करत होती. आता एनआयए करत आहे. एटीएसने तपास केला असता तरी जे सत्य बाहेर यायचं ते आलंच असतं, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. कोणी कशात गुंतलेले असतील. काही चूक केली असेल तर त्यांना त्यांचं प्रायश्चित मिळालंच पाहिजे ही सरकारची भूमिका आहे, असंही ते म्हणाले.
पवार-ठाकरे भेट नियमित
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आजची भेट रुटीन होती. ही भेट आधीच ठरली होती. पवार नेहमी मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. या भेटीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असते. त्यामुळे पवार-ठाकरे यांची भेट ही रुटीन होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पवारच बोलतील
पक्षाचा कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो शरद पवारच घेत असतात. त्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही. त्यामुळे मी या प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
एनआयए आलीच कशी? : अशोक चव्हाण
अँटालिया प्रकरणाचा तपास एटीएस करत असताना एनआयएची गरज नव्हती. एनआयएला हा तपास दिलाच कसा? असा सवाल काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे.