आ. नितेश राणेंची संजय राऊतांवर बोचरी टीका

मुंबई : नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेले प्रक्षोभक विधान, त्यानंतर नारायण राणेंना झालेली अटक आणि जामिनावर सुटका यानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. एकीकडे सामनामधून नारायण राणेंवर खास ठाकरी शैलीत टीका झाल्यानंतर आता नारायण राणेंचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना तितक्याच आक्रमक भाषेत बोचरे उत्तर दिले आहे.
नितेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणाले की, कोण राणे म्हणणारे २ दिवसांपासून सामनातून अग्रलेख लिहून आपण ठाकरेंच्या मिठाला जागतो हे दाखवत आहे! स्व.माँ साहेबबद्दल यांनी काय लिहिले होते हे लोकप्रभामध्ये वाचावे!, असा सल्लाही नितेश राणे यांनी दिला आहे.
कोण राणे म्हणणारे 2 दिवसांपासून सामनातून अग्रलेख लिहून आपण ठाकरे च्या मिठाला जागतो..आणी पवारांचा लोंबता नाही हे दाखवत आहे!
स्व.माँ साहेबबद्दल याच नालायकाने काय लिहिले होते हे लोकप्रभामध्ये वाचावे!
ज्या लावारीस संजय राऊतला आपला बाप कोण आहे हेच माहित नसेल त्याला काय किंमत द्यायची!— nitesh rane (@NiteshNRane) August 26, 2021
दरम्यान, एकीकडे नारायण राणेंच्या वक्तव्याविरोधात संपूर्ण शिवसेना एकवटल्याचे चित्र दिसत असताना दुसरीकडे भाजपाची ठामपणे नारायण राणेंच्या मागे उभा राहिलेला दिसत आहे. दरम्यान, भाजपाच्या राज्य पातळीवरील नेत्यांनंतर आता केंद्रीय पातळीवरूनही नारायण राणेंना पाठिंबा मिळत आहे. अटकेच्या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनीही नारायण राणेंना फोन करून त्यांची विचारपूस केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी नारायण राणेंना फोन केल्याची माहिती भाजपा नेते प्रमोद जठार यांनी दिली आहे. यावेळी अमित शाहांनी नारायण राणेंशी चर्चा करत त्यांच्याकडून पोलिसांनी केलेले कारवाई आणि अटकेच्या कारवाईबाबतचे तपशील याबाबत माहिती घेतली. नारायण राणेंच्या अटकेची थेट केंद्रीय गृहमंत्र्यांनी दखल घेतल्याने आता या प्रकरणात भाजपा पुढे काय करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.