बेस्ट समिती अध्यक्षपदी आशिष चेंबूरकर, सुधार समिती अध्यक्षपदी सदानंद परब

मुंबई : मुंबई महापालिकेच्या महत्वाच्या अशा सुधार समिती अध्यक्ष पदी शिवसेनेचे सदानंद परब यांची सलग तिसऱ्यांदा बहुमताने निवड करण्यात आली आहे. तर बेस्ट समिती अध्यक्ष पदी शिवसेनेचे आशिष चेंबूरकर यांची पाचव्यांदा निवड करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेने गतवर्षीप्रमाणे यंदाही स्थायी, सुधार, बेस्ट व शिक्षण समिती या चारही वैधानिक समित्या आपल्या खिशात घालून भाजपच्या उमेदवारांना आसमान दाखवले आहे. यावेळीही शिवसेनेने राष्ट्रवादी व समाजवादी पक्षांची साथ घेतली. तर काँग्रेसने ऐनवेळी आपले उमेदवार मागे घेऊन शिवसेना उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर केला.
मुंबई महापालिकेच्या सुधार समिती अध्यक्ष पदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेचे सदानंद परब यांना शिवसेनेची ११ मते, राष्ट्रवादी व समाजवादी पक्षाची प्रत्येकी १ मत याप्रमाणे २ मते अधिक मिळाली. त्यामुळे त्यांना एकूण १३ मते मिळाली. तर त्यांच्या विरोधातील काँग्रेसचे उमेदवार आश्रफ आजमी यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतला. यावेळी, भाजपच्या उमेदवार स्वप्ना म्हात्रे यांना १० मते मिळाली. तर काँग्रेसचे ३ सदस्य हे तटस्थ राहिले. त्यामुळे सदानंद परब यांना जास्तीची ३ मते मिळाल्याने ते सलग तिसऱ्यांदा विजयी झाले.
बेस्ट समिती अध्यक्ष पदी आशिष चेंबूरकर पाचव्यांदा विजयी
बेस्ट समितीच्या अध्यक्ष पदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आशिष चेंबूरकर हे पाचव्यांदा बहुमताने विजयी झाले. त्यांनी भाजपचे उमेदवार प्रकाश गंगाधरे यांचा पराभव केला. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवी राजा यांनी, ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे शिवसेनेचा विजयाचा मार्ग सुकर झाला. यावेळीही शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसने मतदान केले. शिवसेनेचे आशिष चेंबूरकर यांना ९ मते तर त्यांच्या विरोधातील भाजपचे उमेदवार प्रकाश गंगाधरे यांना ६ मते मिळाली. तर काँग्रेसचे सदस्य हे तटस्थ राहिले. त्यामुळे अधिकची ३ मते मिळवून आशिष चेंबूरकर यांनी बेस्ट उपक्रमात पाचव्यांदा विजयी होऊन एकप्रकारे विक्रमच केला.