भाजप आ. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावर आता बुधवारी सुनावणी
मुंबई : भाजप आ. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता बुधवारी सुनावणी होणार आहे. नितेश राणेंच्या प्रकरणी राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. नितेश राणेंच्या वकिलांनी हे प्रतिज्ञापत्र पाहण्यासाठी वेळ मागितला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान शिवसैनित संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या कटात नितेश राणेंचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग पोलिसांकडून नितेश राणेंचा शोध सुरु आहे. नितेश राणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टाच्या पुढील सुनावणीपर्यंत नितेश राणेंना अटक करता येणार नाही.
नितेश राणे यांच्यावर शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा आरोप आहे. नितेश राणे या हल्ल्याच्या कटामध्ये सहभागी असल्याचे चौकशीत समोर आले आहे. तसेच पोलिसांनी पकडलेल्या आरोपी नितेश राणेंचे कार्यकर्ते आहेत. हल्ल्यानंतर आमदार नितेश राणे गायब झाले आहेत. त्यांनी त्यांच्या वकिलांकडून सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. सत्र न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने नितेश राणेंच्या वकिलांनी हायकोर्टात अटकपूर्व याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली असून राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
नितेश राणेंच्या अटकपूर्व याचिकेवर व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली. राज्य सरकारने हायकोर्टात नितेश राणेंविरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. हे प्रतिज्ञापत्र उशीरा दाखल करण्यात आले असल्याचा मुद्दा नितेश राणेंच्या वकिलांनी हायकोर्टात मांडला. तसेच प्रतिज्ञापत्र पाहण्यासाठी आणि त्यावर अभ्यास करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे. यामुळे हायकोर्टाने नितेश राणेंच्या प्रकरणावर बुधवारी सुनावणी घेण्याचा निर्णय दिला आहे. तोपर्यंत नितेश राणे यांना अटक करता येणार नाही. नितेश राणे यांच्या बाजूने बुधवारी सुनावणदरम्यान युक्तीवाद करण्यात येणार आहे. बुधवारी नितेश राणे यांना न्यायालयाकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.