फडणवीस, दरेकरांची दरडग्रस्तांसोबत ‘लंच डिप्लोमसी’ !

सातारा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी तीन दिवसांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज साताऱ्यातील पाटण तालुक्यात आंबेघर आणि मोरगिरीमधील पूरग्रस्त गावऱ्यांची भेट घेतली. आंबेघरमध्ये दरड कोसळून १५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या गावातील नागरिकांसाठी गावातील शाळेत निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मोरगिरी गावातील शाळेत असणाऱ्या दरडग्रस्त लोकांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आंबेघर दुर्घटनेनंतर तिथल्या लोकांना या हायस्कूलमध्ये ठेवण्यात आलं आहे. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरांनी दरडग्रस्तांसोबत खाली बसून शाळेतच जेवण केलं. जे जेवण पूरग्रस्तांसाठी देण्यात येतं, त्यातीलच जेवण फडणवीस आणि दरेकर यांनी स्वत:ही खाल्लं.
आंबेघर दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला त्यांचे नातेवाईकही याच शाळेत आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे नुकसान मोठं आहे. सर्वांचं पुनर्वसन होणे गरजेचं आहे. शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालं आहे. नव्याने घर बांधून त्यांना जागा द्यावी लागेल. त्यांना त्यांची पसंती पाहून जागा द्यावी लागेल. अशा घटनांच्या वेळी मिळणारी मदत तोकडीच असते. पण त्यांना वाढीव मदत मिळणं अपेक्षित आहे. तात्पुरती नाही तर शक्य ती मदत परमनंट करावी लागेल.