मुंबई : महाराष्ट्र सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. मलिकांवर राजीनाम्याची टांगती तलवार असताना बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.
नवाब मलिक यांच्या अटकेवर ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात फोनवर सुमारे दहा मिनिटे संभाषण झाले.सूत्रांनी सांगितले की, ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय एजन्सींच्या गैरवापराच्या विरोधात विरोधकांच्या एकत्रीकरणाबद्दल बोलल्या असल्याची माहिती आहे. या संवादादरम्यान नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून हटवू नका, असा सल्ला ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांना दिला आहे.
गेल्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. त्याआधी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्यांवर आरोप झाले. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या पाठिशी ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांनी मंत्र्यांचे राजीनामे घेतले नाहीत. त्याचप्रमाणे मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याची माहिती मिळत आहे.
जून घोटाळे बाहेर काढू, आणखी कणखरपणे लढू !
आमच्यावर जितके आरोप होतील, तितकी अधिक ताकद आम्हाला मिळेल. यापुढे आणखी घोटाळे बाहेर काढले जातील, असा आक्रमक पवित्रा मंत्री नवाब मलिक यांची मुलगी सना मलिकनं घेतला आहे. वडिलांची भेट होत नसल्यानं सकाळपासून आम्ही अस्वस्थ होतो. चिंता वाटत होती. मात्र त्यांची भेट झाल्यावर धीर मिळाला. ही लढाई आम्ही लढू आणि जिंकू, अशी आशा तिनं व्यक्त केली.
नवाब मलिक सातत्यानं एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत होते. त्यामुळे त्यांची बोलती बंद करण्यासाठी ईडीनं कारवाई केली यात शंका नाही. हा दिवस कधीतरी येणार याची आम्हाला कल्पना होती. काही दिवसांपासून आमच्या निकटवर्तीयांना समन्स बजावली गेली. नवाब मलिक यांना अडकवण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला गेला. त्यामुळे हा दिवस पाहावा लागणार हे आम्हाला माहीत होतं. आम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार होतो, असं सना म्हणाल्या.
माझे वडील ३० वर्षांपासून राजकारणात आहेत. आता त्यांच्यावर थेट टेरर फंडिंगचा आरोप झाला आहे. प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. आम्ही कायदेशीर लढा देऊ आणि विजयी होऊ, असा विश्वास सना यांनी व्यक्त केला. सरकारनं मलिक यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे आम्हाला निश्चितपणे ताकद मिळेल. आम्हाला जितका दाबण्याचा प्रयत्न कराल, तितके आम्ही उसळून येऊ आणि कणखरपणे लढू, असा निर्धार सना यांनी बोलून दाखवला.