कणकवली : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आ. नितेश राणे यांना १४ दिवसांची (१८ फेब्रुवारीपर्यंत) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज कणकवली न्यायालयात नितेश राणे यांना उभे करण्यात आले. आजच्या सुनावणीकडे राणे कुटुंबियांसह राज्याचे लक्ष लागले होते. मात्र नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, नितेश राणे यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे सावंतवाडी कारागृह अधीक्षकांकडे अर्ज करण्यात आल्याची माहिती नितेश राणेंच्या वकिलांनी दिली आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांना रुग्णालयात ठेवलं जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नितेश राणे दुपारी ३.२७ वाजता कणकवली न्यायालयात हजर झाले होते. त्यानंतर दोन्ही पक्षाकडून युक्तीवाद करण्यात आला. यानंतर न्यायालयाने राणेंना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान नितेश राणेंनी जामिनासाठी ओरोस येथील सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर सुनावणीची तारीख दिली जाईल. नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांनाही न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे.
शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी जिल्हा, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आ. नितेश राणे कणकवली न्यायालयासमोर शरण आले होते. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने नितेश राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आज या पोलीस कोठडीची मुदत संपली असता ते न्यायालयात हजर झाले होते.
वैभव नाईकांचा राणेंना टोला
शिवसेना आमदार वैभव नाईक म्हणाले की, पोलिसांचा तपास पूर्ण झाला असेल म्हणून त्यांना पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडी मिळाली. नितेश राणे यांची तब्येत दरवेळी बिघडत असते. तब्येत बिघडणं हा राजकीय आजार आहे की खराखुरा आजार आहे हे डॉक्टर ठरवतील. त्यांची तब्येत बिघडू नये म्हणून शुभेच्छा, असा खोचक टोला वैभव नाईक यांनी लगावला आहे.