शिक्षण

नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणार; १० वी, १२ वीच्या परीक्षा ‘ऑफलाईन’च!

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न देता थेट पुढील इयत्तेत प्रवेश दिला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता शिक्षण विभागाने नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट पास करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच १० वी आणि १२ वी च्या परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत.

कोरोनामुळे यंदा संपूर्ण वर्ष विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद होत्या. तसेच कॉलेजसही बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत होते. मात्र, असे असतानाही १० वी आणि १२ वीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याची घोषणा मागील शनिवारी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. परंतु, परीक्षा ऑफलाईन घेण्याला विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवताना आंदोलने केली. मात्र, असे असतानाही शिक्षण विभागाने परीक्षा ऑफलाईनच घेण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. वर्षभरात विद्यार्थ्यांच्या शाळा बंद होत्या. पण शिक्षण प्रक्रिया चालूच होती. राज्यातील शाळांमध्ये आँनलाईन पध्दतीने अध्ययन व अध्यापन प्रक्रिया चालू होती. कोरोना संक्रमणाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, आता असणाऱ्या कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून व विदयार्थी हित लक्षात घेता शालेय शिक्षण विभागाने राज्य मंडळाशी संलग्न असणाऱ्या शाळांमधील इ. नववी व इ. अकरावी च्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील.

त्या म्हणाल्या, कोविड १९ महामारीच्या अपवादात्मक परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी च्या शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये २३ नोव्हेंबर २०२० पासून सुरू केल्या आहेत. इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून शासनस्तरावरून विविध स्वरूपाचे प्रयत्न केले गेले आहेत व अद्याप देखील ते सुरू आहेत. आपल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने दिक्षा (DIKSHA) आधारित अभ्यासमाला, ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमांचे डी. डी. सह्याद्री वाहिनीवरून प्रक्षेपण सुरू आहे.

तसेच इयत्ता निहाय यु टयुब चॅनल, जिओ टिव्हीच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले जात आहेत. राज्यातील शिक्षकही या परीस्थितीत ऑनलाईन, ऑफलाईन स्वरूपात विविध उपक्रमाव्दारे शिक्षण सुरू ठेवत आहे. राज्यात शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शिकणे वेगवेगळ्या मार्गांनी कसे सुरू राहील या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. ज्या ज्या मार्गाने विद्यार्थ्यापर्यत पोहचता येईल त्या त्या मार्गाने विद्यार्थ्याना अध्यापन करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर अनेक शाळांनी, उच्च माध्यमिक विद्यालयांनी अनेक प्रयत्न केले आहेत. या काळात शिक्षकांनी प्रत्यक्ष वर्गात केलेले अध्यापन, अंतर्गत मूल्यमापन केले आहे.

या शैक्षणिक वर्षाच्या काळात राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. या करिता येणाऱ्या कालावधीमध्ये पुढील शैक्षणिक वर्षामध्ये मागील वर्षातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत कार्यक्रम आखण्यात येईल व त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे शासन विशेष लक्ष देईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. राज्यातील प्रत्येक विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेईल यासाठी आपण निश्चितच कटिबद्ध राहुया. विद्यार्थ्यांचे आरोग्य व पुढील शैक्षणिक धोरणांचा विचार करूनच शासन शैक्षणिक धोरण अंमलात आणेल असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button