Top Newsराजकारण

कुडाळ-मालवण विधानसभेसाठी निलेश राणेंची मोर्चेबांधणी ?

सिंधुदुर्ग : आगामी विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदारसंघातून निलेश राणे हे निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. नारायण राणे यांना भाजपने केंद्रीय मंत्रिपद दिल्यानंतर आता कोकणातील राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. कारण नारायण राणे यांनी विधानसभेत ज्या मतदारसंघाचं नेतृत्त्व केलं, त्याच कुडाळ मालवण मतदारसंघात पुन्हा रंगत येण्याची चिन्हं आहेत. कारण आता या मतदारसंघासाठी माजी खासदार निलेश राणे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. निलेश राणे हे भरघोस मतांनी निवडून येऊन कुडाळ मालवणचे आमदार होऊदे असं साकडं सिंधुदुर्ग राजाला घालण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे यावेळी निलेश राणे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच हे साकडे घालण्यात आल्याने, आता निलेश राणे आगामी लोकसभेऐवजी, विधानसभेचीच निवडणूक लढवण्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

कुडाळ मालवण विधासभेत सध्या शिवसेनेचे वैभव नाईक हे नेतृत्त्व करतात. वैभव नाईक यांनी २०१४ मध्ये नारायण राणे यांचा पराभव केला होता. तेव्हापासून या मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व आहे. कोकणातल्याच नव्हे तर राज्याच्या राजकीय पटलावर सिंधुदुर्गचं एक वेगळ स्थान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदासंघ आहेत. यामध्ये कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या मतदारसंघांचा समावेश आहे. २०१४ मध्ये यापैकी २ जागा शिवसेनेकडे तर एक काँग्रेसने जिंकली होती. तर २०१९ मध्ये भाजपच्या नितेश राणेंनी एक आणि शिवसेनेने दोन जागी विजय कायम राखला.

२०१४ ला कुडाळ-मालवण मतदारसंघातून शिवसेनेचे वैभव नाईक नारायण राणेंचा पराभव करत १०,५०० मतांनी विजयी झाले. या मतदारसंघात चौरंगी लढत झाली होती. शिवसेनेच्या वैभव नाईक यांना ७१ हजार, काँग्रेसच्या नारायण राणे यांना ६०,५००, तर भाजपच्या बाब मोंडकर यांना ४५०० आणि राष्ट्रवादीच्या पुष्पसेन सावंत यांना २५०० मते पडली होती. नारायण राणेंचा अनपेक्षित पराभव करून वैभव नाईक हे राज्यात जायंट किलर म्हणून गणले जाऊ लागले.

लोकसभा निवडणुकीत निलेश राणेंचा पराभव

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निलेश राणे यांना २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये पराभव झाला होता. दोन्ही वेळी शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी त्यांचा पराभव केला. आता निलेश राणे हे एकेकाळी नारायण राणे प्रतिनिधीत्व करत असलेल्या कुडाळ मालवण मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button