‘एनआयए’चा तपास बनला ठाकरे सरकारच्या गळ्याचा फास!
वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांचा बळी जाणार की गृहमंत्र्यांचा?

मुंबई : पूजा चव्हाण, सचिन वाझे ही प्रकरणे हाताळण्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांना अपयश आल्याने देशमुख यांना गृहमंत्रीपदावरून हटवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे गृहमंत्री बदलण्याऐवजी मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे राज्याला नवा गृहमंत्री मिळणार की मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी होणार? हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. आज दुपारी ४ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. यावेळी गृहमंत्री बदलाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, शरद पवार याबाबत काय निर्णय घेतात, यावरच देशमुख यांच्या गृहमंत्रीपदाचं भविष्य ठरणार आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी सचिन वाझे प्रकरणावर चर्चा करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना हटवण्याच्या चर्चा सुरू झाल्या. दुपारनंतर अनिल देशमुख यांचं गृहमंत्रीपद काढून घेण्याच्या चर्चांना अधिकच जोर चढला. देशमुख यांच्या ऐवजी अजित पवार किंवा जयंत पाटील यांच्याकडे हे पद सोपविण्याच्या हालचाली सुरू असल्याचंही सांगण्यात आलं. अनिल देशमुख हे राज्यातील अनुभवी नेते आहेत. त्यांना मंत्रिपदाचा दीर्घकाळ अनुभव आहे. मात्र, आघाडी सरकार चालवताना निर्णय घेताना दिरंगाई होत असतो, त्यामुळे देशमुख यांना बदललं जाईल असं वाटत नाही, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. तत्काळ निर्णय घेण्यासाठी ते परिचित आहेत. शिवाय ते अनुभवी मंत्री आणि नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्याचा राष्ट्रवादीत विचार सुरू आहे. अजित पवार यांचे विरोधकांशी संबंध चांगले असल्याने या अजितदादांकडे हे खातं गेल्यास विरोधकां या खात्याला टार्गेट करणं थांबवतील. त्यामुळे अजितदादांकडे हे पद देण्याचं राष्ट्रवादीत घटत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, अजितदादांकडे उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद असल्याने जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद द्यावे असंही राष्ट्रवादीच्या एका गटाचं म्हणणं आहे. जयंत पाटील यांनी यापूर्वीही गृहमंत्रीपद सांभाळलेलं असल्याने त्यांच्याकडे हे पद द्यावं, अशी मागणी होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. एनआयएचा तपास हा सरकारच्या गळ्याचा फास बनत चालला आहे. त्यामुळेच वाझे प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांवरही गाज पडू शकते अशीही चर्चा आहे.
गृहमंत्र्यांना हटवा, भाजपची मागणी
“सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणातील जी मोठी नावं बाहेर येत आहेत, किंवा येतील, त्यातून मुंबई पोलिसांची होणारी नाचक्की खेदजनक आहे. अशा लोकांना पाठीशी घालणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी राजीनामा द्यावा. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) जाणते राजे आहेत, मुंबई पोलिसांची नाचक्की करणाऱ्या गृहमंत्र्यांना हटवावं” अशी मागणी भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केली आहे.
“अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्याशिवाय या प्रकरणाचा छडा लागणार नाही. शरद पवार महाराष्ट्राचे जाणते राजे मानले जातात. त्यांच्या पक्षाचा गृहमंत्री गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला पाठीशी घालत असेल. तर ही खेदजनक गोष्ट आहे. गृहमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे” अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली.
सचिन वाझेंचे निलंबन
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन करण्यात आले आहे. यामुळे वाझेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सचिन वाझे हे सध्या राष्ट्रीय तपासयंत्रणेच्या (NIA) कोठडीत आहेत. त्यांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली होती. यानंतर रविवारी विशेष न्यायालयात हजर करून NIA ने 25 मार्चपर्यंत त्यांचा रिमांड मिळवला.