न्हावा बेटाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास होणार !
नवी मुंबई : सिडकोच्या अखत्यारितील न्हावा बेटावरील ६० हेक्टर क्षेत्रावर पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी सिडकोतर्फे स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. करंजाडे व ठाणे खाडी किनाऱ्याने तिन्ही बाजूने वेढलेल्या व समोर ऐतिहासिक एलिफंटा लेण्यांचे दर्शन घडवणाऱ्या या बेटाचे पर्यटन स्थळाच्या अनुषंगाने विकास करण्याचे सिडकोने नियोजित केले आहे. या माध्यमातून महाराष्ट्रासोबतच नवी मुंबईतदेखील पर्यटन क्षेत्राच्या विकासात मोठी भर पडणार आहे. बेट हे सध्या विकसित होत असलेल्या उलवे नोडपासून केवळ ५ कि.मी. अंतरावर आहे.
मुंबई ट्रान्सहार्बर लिंकपासूनदेखील नजीकच्या अंतरावर आहे. ६० हेक्टरपैकी ३० हेक्टर क्षेत्र हे सीआरझेड-२ अंतर्गत येत असल्याने व नवी मुंबई विकास आराखड्यानुसार रिजनल पार्क झोनमध्ये याचा समावेश असल्याने या बेटाचा पर्यटन व विविध प्रकारच्या सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमासाठी विकास करण्याचा प्रस्ताव सिडको महामंडळाच्या विचाराधीन आहे.
याबाबत सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले की, सिडकोच्या प्रयत्नांमुळे न्हावा बेट हे नवी मुंबईतील पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरेल यात काही शंका नाही. या प्रकल्पामुळे नवी मुंबई सोबतच महाराष्ट्राचे नावदेखील पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतले जाईल.
सदर प्रस्तावासाठी इच्छुक गुंतवणूकदार व खरेदीदारांमध्ये या प्रकल्पाविषयी उत्सुकता निर्माण व्हावी. तसेच त्यांच्याकडून विविध सूचना व अभिप्राय प्राप्त करण्यासाठी सिडकोतर्फे स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव प्रकाशित करण्यात आला आहे. या प्रस्तावाद्वारे इच्छुक अर्जदारांना या प्रकल्पाविषयी संपूर्ण माहिती सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर www.cidco.maharashtra.gov.in वर २७ जून २०२१ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच हा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत २९ जुलै २०२१ पर्यंत आहे. या प्रस्तावांतर्गत प्राप्त झालेल्या सूचना व अभिप्रायांचा विचार पूर्व अर्हतेसाठी करण्यात येणार नाही. तसेच प्राप्त झालेल्या सूचना व अभिप्रायांचा समावेश विनंती प्रस्तावात करण्याचे अथवा न करण्याचे अधिकार सर्वस्वी सिडको महामंडळ राखून ठेवत आहे.