
कानपूर : भारतीय संघाला पहिल्या डावात ३४५ धावांवर रोखल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने धमाकेदार सुरुवात केली होती. न्यूझीलंडने काल एकही गडी न गमावता ५७ षटकांमध्ये १२९ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चांगलंच पुनरागमन केलं. भारतीय गोलंदाजांनी किवी संघाचा डाव १४२.३ षटकांमध्ये २९६ धावांवर रोखला. त्यामुळे टीम इंडियाला ४९ धावांची नाममात्र आघाडी मिळाली आहे. दरम्यान, भारताने दुसऱ्या डावात १ गडी गमावून १४ धावा केल्या आहेत. सलामीवीर शुभमन गिल १ धाव काढून बाद झाला. मयंक अगरवाल ४ आणि चेतेश्वर पुजारा ९ धावांवर खेळात आहेत. भारताकडे एकूण ५३ धावांची आघाडी आहे.
भारत-न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्यांच्या वर्चस्वाला अक्षर पटेलनं धक्का दिला. टॉम लॅथम व विल यंग या जोडीनं १५१ धावांची भागीदारी करून न्यूझीलंडसाठी भक्कम पाया रचला. पण, अक्षरनं पाच विकेट्स घेत त्यांना बॅकफूटवर फेकले. लॅथम व यंग यांच्यानंतर लॅथम व केन विलियम्सन ही जोडी वगळता किवींच्या अन्य फलंदाजांना फार मोठी भागीदारी करता आली नाही. अक्षरनं त्याच्या फिरकीच्या जाळ्यात किवी फलंदाजांना अडकवले. वृद्धीमान सहाच्या जागी बदली खेळाडू म्हणून आलेल्या केएस भारतनं यष्टिंमागे कौशल्य दाखवलताना संधीचं सोनं केलं. बापू या टोपणनावानं ओळखल्या जाणाऱ्या अक्षरनं कानपूर कसोटी अनेक विक्रमही मोडले.
रवींद्र जडेजा (५०), शुबमन गिल ( ५२) आणि श्रेयस अय्यर ( १०५) यांच्या दमदार खेळीनंतरही भारताला ३४५ धावांवर समाधान मानावे लागले. टीम साऊदीनं ६९ धावा देताना ५ बळी टिपले. कायले जेमिन्सननं तीन व अजाझ पटेलनं दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम व विल यंग यांनी पहिल्या विकेटसाठी १५१ धावांची भागीदारी केली. आर अश्विननं टीम इंडियाला तिसऱ्या दिवशी पहिले यश मिळवून दिले. केएस भारतनं सुरेख कॅच टिपला अन् विल यंगला माघारी जावं लागलं. यंगनं २१४ चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीनं ८९ धावा केल्या. तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपूर्वीच्या अखेरच्या षटकात उमेश यादवनं किवी कर्णधार केन विलियम्सनला ( १८) पायचीत केले.
लॅथम एका बाजूनं खिंड लढवत होता आणि अनुभवी फलंदाज रॉस टेलर त्याच्या साथीला होता. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर पुढे मारण्याच्या प्रयत्नात टेलरनं जवळपास त्याची विकेट दिलीच होती, परंतु केएस भारतनं स्टम्पिंगची संधी गमावली. त्यानंतर रिप्लेत चेंडू बॅटला घासून गेल्याचे दिसले आणि भारतनं एकाच चेंडू कॅचही सोडला व स्टम्पिंगही. पण, अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर भारतनं टेलरचा सुरेख झेल टिपला, त्यापाठोपाठ हेन्री निकोल्सलाही ( २) पायचीत करून अक्षरने किवींना दोन धक्के दिले. भारताच्या मार्गात मोठा अडथळा बनलेल्या लॅथमलाही अक्षर-भारत जोडीनं माघारी पाठवले. अक्षरच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याचा लॅथमचा प्रयत्न फसला अन् भारतनं त्याला यष्टिचीत केलं. लॅथम २८२ चेंडूंत १० चौकारांसह ९५ धावांवर बाद झाला.
रवींद्र जडेजानं अप्रतिम चेंडू टाकून रचिन रवींद्रची (१३) विकेट घेतली. टॉम ब्लंडल व कायले जेमिन्सन ही जोडी सावध खेळ करून हळुहळू पिछाडी कमी करत होती, परंतु पुन्हा एकदा अक्षरनं विकेट मिळवून दिली. त्यानं ब्लंडलचा (१३) त्रिफळा उडवला. पुढील षटकात अक्षरनं किवीच्या टीम साऊदीला ( ५) बाद करून डावातील पाचवी विकेट घेतली. अक्षरनं अवघ्या ७ डावांमध्ये पाचवेळा डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्यानं चार्ली टर्नर ( १८८७-८८) व टॉम रिचर्डसन (१८९३-९५) यांच्यांशी बरोबरी केली. आर अश्विननं विकेट घेताना कायले जेमिन्सनला २३ धावांवर माघारी पाठवले. अश्विननं अखेरची विकेट घेत किवींचा डाव २९६ धावांवर गुंडाळला. भारतानं पहिल्या डावात ४९ धावांची आघाडी घेतली. अश्विननं तीन विकेट्स घेतल्या.
अक्षर पटेलचा ‘पंच’
दरम्यान, भारताकडून फिरकीपटू अक्षर पटेलने सर्वात किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने ३४ षटकांपैकी ६ षटकं निर्धाव टाकत ६२ धावा दिल्या, बदल्यात न्यूझीलंडचे ५ फलंदाज बाद केले.
अश्विन आणि पंचांमध्ये वाद; कोच राहुल द्रविड थेट मॅच रेफरींच्या केबिनमध्ये
रवीचंद्रन अश्विन आणि वाद हे समीकरण ठरलेलंच आहे. तो कधी खेळाडू, तर कधी पंचांशी भिडल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. न्यूझीलंड विरुद्ध कानपूर येथे खेळवल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये असेच काहीसे घडले. वास्तविक, न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंगला बाद केल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. या प्रयत्नात अश्विनने एक नवीन युक्ती आजमावली आणि त्याने स्टंपच्या अगदी जवळ गोलंदाजी करायला सुरुवात केली. हे करत असताना तो नॉन-स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या अंपायर आणि फलंदाजासमोर अनेकवेळा आला. यावर अंपायर नितीन मेनन नाराज झाले आणि त्यांनी अश्विनला यासाठी अनेकदा अडवले.
पंच नितीन मेनन यांची सूचना आर. अश्विनच्या लक्षात आली नाही आणि दोघांनी त्यावरून वाद घालण्यास सुरुवात केली. ही घटना न्यूझीलंडच्या डावाच्या ७७ व्या षटकात घडली. हा वाद इथेच थांबला नाही. पुढील तीन षटके या मुद्द्यावर पंच आणि अश्विनमध्ये वाद सुरूच होता. वाद अधिकच वाढत असल्याचे पाहून कर्णधार अजिंक्य रहाणेलाही मध्यस्थी करावी लागली.
फॉलो-थ्रूमध्ये अश्विन त्यांच्यासमोर येत आहे आणि अशा स्थितीत त्यांना स्ट्राईकवर उभा असलेला फलंदाज दिसत नाही आणि कोणत्याही प्रकारचे अपील असल्यास त्यांना निर्णय देताना त्रास होईल, असा पंचांचा तर्क होता. तर अश्विनने असा युक्तिवाद केला की पंच त्याला गोलंदाजी करण्यापासून रोखत आहेत.
अश्विन वारंवार सांगत होता की, त्याने डेंजर एरियाशी (विकेटच्या समोरचा भाग) छेडछाड केली नाही. नियमानुसार कोणताही गोलंदाज त्याच्या फॉलो-थ्रूमध्ये डेंजर एरियात जाऊ शकत नाही. कारण असे केल्याने गोलंदाजाच्या बुटांच्या स्पाइकमुळे विकेट खराब होण्याची भीती असते.
अंपायर मेनन आणि अश्विनचे संभाषण कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मी जे काही करतोय, ते नियमात राहून करतोय, असे अश्विन सांगत होता. अश्विन आणि पंच मेनन यांच्यात मैदानावर वारंवार वाद होत असल्याचे पाहून प्रशिक्षक राहुल द्रविड याने थेट सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांच्या केबिनकडे धाव घेतली आणि या मुद्द्यावर दोघांमध्ये संभाषण झाले. या भेटीनंतर पुन्हा मैदानावर अंपायर आणि अश्विन यांच्यात वाद झाला नाही.