
वेलिंग्टन : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर न्यूझीलंडचा भारत दौऱ्यावर येणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडनं विराट कोहली अँड कंपनीला पराभवाचा धक्का दिला आणि स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आणले. त्याआधी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पराभूत केले होते. आता दुसऱ्या टप्प्यातील मालिकेत किवी संघाचा पाहुणचार घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडनं गुरूवारी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघात ट्रेंट बोल्ट व अष्टपैलू कॉलिन डी ग्रँडहोम यांना समावेश करण्यात आलेला नाही.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला १७ नोव्हेंबरला सुरुवात होणार आहे. तीन ट्वेंटी-२० सामन्यानंतर २५ नोव्हेंबरपासून कानपूर येथे पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे. दुसरी कसोटी ३ डिसेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. भारताची ही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील दुसरी मालिका आहे. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघात फार बदल करण्यात आलेले नाहीत. पण, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकणाऱ्या संघातील दोन खेळाडू बोल्ट व ग्रँडहोम हे बायो बबलमुळे आलेल्या थकव्यामुळे या मालिकेत खेळणार नाहीत.
कानपूर व मुंबईत होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी किवींनी पाच फिरकीपटूंचा समावेश केला आहे. त्यात अजाज पटेल, मिचेल सँटनर आणि विल समरविल हे प्रमुख फिरकीपटू असतील, त्यांना बॅकअप म्हणून रचिन रविंद्र आहेच. शिवाय स्फोटक यष्टिरक्षक-फलंदाज ग्लेन फिलिप्सही संघात आहे. जलदगती गोलंदाजाची जबाबदारी टीम साऊदी, कायले जेमिन्सन आणि निल वॅगनर यांच्यावर असेल.
न्यूझीलंडचा संघ – केन विलियम्सन, टॉम ब्लंडल, डेव्हान कॉनवे, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र, मिचेल सँटनर, विल समरविल, टीम साऊदी, रॉस टेलर, विल यंग, निल वॅगनर