मुंबई / नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या कोविड रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा राज्य सरकार अलर्ट झालं आहे. यातच दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. केंद्र सरकारनं याबाबत देशातील सर्व राज्य सरकारला पत्र लिहून सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत विशेष खबरदारी घ्यावी असं केंद्राने कळवलं आहे. दरम्यान, आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. ओमिक्रॉन असं नाव देण्यात आलेल्या नवा व्हेरिएंट अतिशय वेगानं पसरत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे जगभरातील देशांची झोप उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच अधिकाऱ्यांची बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवरील उठवण्यात आलेल्या निर्बंधांचा आढावा घेण्याचे आदेश मोदींनी दिले. त्यामुळे आता परदेशातून भारतात दाखल होत असलेल्या नागरिकांवर सरकारचं बारीक लक्ष असेल.
राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यात सार्वजनिक वाहतुकीत केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबत मॉल, सभागृह, कार्यक्रम याठिकाणी लसीचे दोन डोस असलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून युनिवर्सल पास देण्यात आले आहेत. प्रवास करताना लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र असणं बंधनकारक करण्यात आले आहे.
काय आहे नियमावली?
– रिक्षा, टॅक्सी, बस, कॅबमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवास करता येईल. म्हणजे यापुढे सार्वजनिक अथवा खासगी वाहनात केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. लस घेतली नसेल तर प्रवास करता येणार नाही.
– महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना पूर्ण लसीकरण असलेले प्रमाणपत्र किंवा प्रवासाच्या ७२ तास आधीचा आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट देणे बंधनकारक
– सिनेमा हॉल, लग्नाचे हॉल, सभागृह याठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच उपस्थित राहता येईल.
– मास्क घातलेला नसेल तर ५०० रुपये दंड
– दुकानात ग्राहकाकडे मास्क न घातल्यास दुकानदाराला १० हजार दंड, तर मॉलमध्ये कुणी मास्क न घातल्यास मालकाला ५० हजार दंड
– राजकीय सभा, कार्यक्रमात कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार दंड
– भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी केवळ २५ टक्के लोकांनाच उपस्थिती
– टॅक्सी किंवा खासगी वाहनात मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड तसेच वाहन मालकासही ५०० रुपये दंड ठोठावण्यात येईल.
– किमान ६ फूट अंतर राहील असं सोशल डिस्टेंसिंगचं पालन करावं.
– सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई
पंतप्रधानांनी घेतला आढावा
नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मोदींनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. परदेशांमधून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्याची गरज मोदींनी बोलून दाखवली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ‘हाय रिस्क’ म्हणून घोषित केलेल्या देशांमधून येणाऱ्यांची कोविड चाचणी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कोविड प्रतिबंधात्मक प्रोटोकॉल पाळले जायला हवेत, असंही मोदी म्हणाले. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नव्या व्हेरिएंटचा प्रभाव अधिक असलेल्या देशांमधून येणारी विमानं रोखण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या बैठकीला कॅबिनेट सचिव, आरोग्य सचिव, कोविड टास्क फोर्सचे प्रमुख उपस्थित होते. त्यांच्याकडून मोदींनी देशातील स्थितीचा आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांची संख्या १५ डिसेंबरपासून कोरोना आधीच्या स्थितीत नेण्याची माहिती नागरी उड्डाण मंत्रालयानं दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही बैठक झाली.
‘ऍट रिस्क’ देशांमधून येणाऱ्या विमानांवर बंदी?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दक्षिण आफ्रिका, बोटस्वाना, इस्रायल आणि हाँगकाँगचा समावेश ऍट रिस्क देशांच्या यादीत करण्यात आला आहे. नव्या व्हेरिएंटचा फैलाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपेंनी केली आहे. देशात कोरोनाची पहिली लाट आली. त्यावेळी वेळेत आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंदी न केल्याबद्दल मोदी सरकारवर टीका झाली होती.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळं तिसरी लाट येण्याचा धोका
दक्षिण आफ्रिकेत ओमीक्रॉन व्हेरिएंटचे १०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा हा नवा स्ट्रेन हळूहळू सर्वत्र पसरत चालला आहे. आतापर्यंत कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट सर्वात वेगाने पसरणारा व्हेरिएंट होता. पण आता ओमीक्रॉन व्हेरिएंट त्यापेक्षा जास्त वेगाने पसरू शकतो असं वैज्ञानिकांना वाटतं. ओमीक्रॉन व्हेरिएंटमुळे वैज्ञानिकांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. कारण हा व्हेरिएंट डेल्टापेक्षा ७ पट वेगाने पसरण्याचा अंदाज आहे. इतकचं नाही तर लोकांमध्ये संक्रमित करण्याचा धोका डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमीक्रॉन व्हेरिएंटमध्ये जास्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या व्हेरिएंटची ओळख पटल्यापासून आतापर्यंत त्याचे ३२ म्यूटेट झाले आहेत. भारतात सध्या या व्हेरिएंटचा कुठलाही रुग्ण आढळला नाही. परंतु परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कठोर तपासणी करण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत. ओमीक्रॉन व्हेरिएंटमुळे जगातील अनेक देशात चिंता पसरली आहे. एकापाठोपाठ एक अशा अनेक देशांनी प्रवासावर निर्बंध आणले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या ऑस्ट्रिया, कॅनडा, जर्मनी, ब्रिटन, अमेरिका, इटली, नेदरलँडसारख्या देशातील प्रवाशांवर बंदी आणली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार समितीने दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच समोर आलेला नव्या व्हेरिएंट सर्वात वेगाने पसरणारा चिंताजनक व्हेरिएंट असल्याचं म्हटलं आहे. ग्रीक वर्णमालेसह त्याला ओमीक्रॉन नाव दिलं आहे. शुक्रवारी संयुक्त राष्ट्रच्या आरोग्य संस्थेने याबाबत घोषणा केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला हाच डेल्टा व्हेरिअंट कारणीभूत होता. यामुळे वेगाने पसरणारा आणखी एक धोकादायक व्हेरिअंट सापडल्याने हा व्हेरिअंट डेल्टापेक्षा जास्त धोकादायक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ओमीक्रॉनमुळे अनेक देशांना प्रभावित क्षेत्रातून प्रवासावर बंदी आणण्याची आवश्यकता भासली आहे.
रुग्णालये आणि कोविड सेंटरचे फायर ऑडिट करा; एकनाथ शिंदे यांच्या सूचना
परदेशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा मोठा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकार सावध झालं आहे. महाराष्ट्र सरकारनेही त्याची गंभीर नोंद घेतली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व रुग्णालये आणि कोविड सेंटरचं फायर ऑडिट करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला आहे. हा व्हेरिएंट अत्यंत घातक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज तातडीची बैठक घेऊन प्रशासनाला सूचना केल्या. तर, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे तातडीची बैठक घेतली. बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांचेसह ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सर्व महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी सर्व रुग्णालये तसेच कोविड उपचार केंद्रांमधील आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपकरणांची तपासणी करा. त्या कार्यरत करण्यासाठी सज्ज करून ठेवण्याचे निर्देशही शिंदे यांनी आज दिले.
राज्यातील सर्व रुग्णालये सज्ज ठेवा
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या राज्यात घटते आहे, ही समाधानाची बाब आहे. त्यामुळे यंत्रणा जरा निर्धास्त झालेल्या दिसतात. सामान्य नागरिकांकडून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे कठोरपणे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले असून आता आपल्याला गाफिल राहून चालणार नाही. कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिकांची रुग्णालये सज्ज ठेवा, सर्व रुग्णालयांच्या इमारतींचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट तातडीने करुन घ्या, अशा सूचना शिंदे यांनी केल्या. सुदैवाने सध्या रुग्ण नसल्याने बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यंत्रणा बंद आहेत, रुग्णालयांमधील आयसीयू कक्ष, ऑक्सिजन प्लान्ट, व्हेंटिलेटर यंत्रे यांची तपासणी करुन ते सुस्थितीत असल्याची खात्री करुन घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
परदेशातून आलेल्यांची यादी तयार करा
मुंबई महानगरपालिकेने विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करुन मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये जे प्रवासी विदेशातून आले आहेत, त्यांची यादी सर्व महानगरपालिकांना उपलब्ध करुन द्या. कोरोनाचा नवा घातक व्हेरियंट सापडलेल्या 10 देशांमधून आलेल्या प्रवाशांची माहिती सर्व महानगरपालिकांनी सहायक आयुक्तांच्या माध्यमातून घ्यावी. अति जोखमीच्या देशातून गेल्या 14 दिवसांतून आलेल्या प्रवाशांची देखील यादी विमानतळाकडून घेण्याच्याही सूचनाही त्यांनी केल्या. सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या प्रमुखांनी आपल्या अखत्यारितील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन दक्ष राहण्याच्या सूचना द्या. सर्व यंत्रणांची तपासणी करुन घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
व्हेंटिलेटर सज्ज ठेवा
यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे करण्यात येणार आहे. त्यांचे कोणत्याही परिस्थितीत गृह अलगीकरण करण्यात येणार नाही. दुर्दैवाने असा रुग्ण आढळून आल्यास त्याच्यावर कोरोना उपचार केंद्रांमध्ये स्वतंत्रपणे उपचार करण्यात येणार असल्याचे काकाणी सांगितले. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालयांचे तसे कोविड उपचार केंद्रांचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन त्याची चाचणी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. व्हेन्टिलेटरची तपासणी करुन ते गरजेनुसार वापरता येईल यादृष्टीने ते सज्ज करुन ठेवण्यात येणार असल्याचेही काकाणी यांनी सांगितले. घातक व्हेरियंटचा एकही रुग्ण जर एखाद्या इमारतीत आढळला तर संपूर्ण इमारत सील करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.