राजकारणशिक्षण

म्हाडा परीक्षेची नवीन तारीख जाहीर

आता १ ते १५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान होणार परीक्षा

मुंबई : म्हाडा सरळसेवा भरती २०२१ साठी १२ डिसेंबर २०२१ ते २० डिसेंबर २०२१ या दरम्यान चार टप्प्यात परीक्षा घेण्यात येणार होते. मात्र, ११ डिसेंबर २०२१ रोजी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीचे संचालक यांना सायबर पोलीस, पुणे यांनी म्हाडा सरळसेवा भरतीची प्रश्नपत्रिका फोडण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतले आणि अटक केली. या घटनेमुळे सुयोग्य, गुणवंत आणि पात्र उमेदवारांवर अन्याय होऊ नये यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाने दिनांक १२ डिसेंबर २०२१ ते २० डिसेंबर २०२१ दरम्यान चार टप्प्यात घेण्यात येणारी परीक्षा तत्काळ रद्द केली. सदर परीक्षा आता १ फेब्रुवारी २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान होणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेचे तपशिलवार वेळापत्रक आणि अन्य सूचना लवकरच म्हाडाच्या संकेतस्थळावरुन प्रसिद्ध करण्यात येतील.

राज्यात पेपर फुटीचं प्रकरण चांगलंच गाजत आहे. आरोग्य भरती परीक्षेपाठोपाठ म्हाडाच्या परीक्षेचाही पेपर फुटल्यानं विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. तसंच विरोधी पक्ष असलेल्या भाजपने या सगळ्या प्रकरणात राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ११ डिसेंबर रोजी मध्यरात्री समाजमाध्यमाद्वारे दिलगिरी व्यक्त करत परीक्षा स्थगित केल्याची माहिती दिली होती. त्यानंतर रविवारी सकाळी पेपर फुटल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर आता म्हाडाकडून परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.

प्रश्नपत्रिकेबाबत एकाच व्यक्तीला माहिती होती. प्रश्नपत्रिका छपाईला गेल्यावर संबंधित कंपनीने त्या प्रश्नपत्रिका आपल्या ताब्यात ठेऊ नयेत, असे स्पष्ट नियम असतानाही या कंपनीच्या मालकाने सदर प्रश्नपत्रिका आपल्या ताब्यात ठेवली. त्याने गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परिक्षेत काही गैरप्रकार होणार असल्याचा संशय आपणाला या आधीच आला होता. त्यामुळेच आपण तीन दिवसांपूर्वीच गैरप्रकार आढळल्यास परीक्षा रद्द करण्याचा इशारा दिला होता, असं आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.

खासगी संस्थांकडून परीक्षा घेण्यात येत असल्याने गोपनीयतेचा भंग होण्याचे प्रकार वाढीस लागत आहेत. त्यामुळे या पुढे म्हाडाच सर्व परीक्षा घेणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे आता घेतलेले शुल्क परत करण्यात येईल. शिवाय पुढील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही, अशी घोषणाही आव्हाड यांनी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button