ठाणे : राज्यातील कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या ११ जिल्ह्यांत ब्रेक दि चेन अंतर्गत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र, मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरविणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली होती. अशावेळी आता ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी नवी कोरोना नियमावली जाहीर केली आहे. त्यात व्यापारी वर्गाला मोठा दिलासा देण्यात आलाय. मात्र, मॉल्स आणि सिनेमागृह बंदच राहणार असल्याचंही महापालिकेनं स्पष्ट केलंय.
ठाणेकरांसाठी नवी नियमावली काय?
१. अत्यावश्यक सेवेची सर्व दुकानं आठवड्यातील सर्व दिवस रात्री १० वा. पर्यंत चालू राहणार
२. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं आणि आस्थापना सोमवार ते शनिवार रात्री १० वा. पर्यंत सुरु राहणार. मात्र, रविवारी ही दुकानं, आस्थापना बंद राहतील. शॉपिंग मॉल्स पूर्णत: बंद राहतील.
३. मेडिकल आणि केमिस्ट शॉप्ट सर्व दिवस पूर्ण वेळ सुरु राहतील.
४. रेस्टॉरंट्स, हॉटेल्स ५० टक्के क्षमतेनं सोमवार ते शनिवार दुपारी ४ पर्यंत सुरु राहतील व रविवारी बंद राहतील. मात्र, पार्सल आणि टेक अवे सुविधा आठवड्यातील सर्व दिवस नियमित वेळेप्रमाणे सुरु राहतील.
५. व्यायामशाळा, योग वर्ग, केश कर्तनालये, ब्युटी पार्लर्स, स्पा इत्यादी ५० ठक्के क्षमतेनं सोमवार ते शनिवार रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहतील. रविवारी मात्र पूर्णपणे बंद राहतील.
६. जलतरण तलाव आणि निकट संपर्क येऊ शकतो असे क्रीडा प्रकार वगळून अन्य इनडोअर आणि आऊटडोअर खेळास संबंधित माहापालिका, नगरपालिका, स्थानिक प्राधिकरण यांनी नियमित वेळेनुसार परवानगी असेल.
७. सार्वजनिक उद्याने, खेळाची मैदाने हे केवळ व्यायाम, चालणे, धावणे आणि सायकलिंग यासाठी सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरु राहतील.
८. सर्व शासकीय आणि खासगी कार्यालये १०० टक्के क्षमतेनं सुरु राहतील.
९. सर्व कृषी विषयक सेवा, बांधकाम उद्योग, औद्योगिक सेवा, मालवाहतूक सेवा नियमितपणे चालू राहतील.
१०. सर्व सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स पुढील आदेशापर्यंत बंदच राहतील.
११. सर्व प्रकारची धार्मिक स्थळं पुढील आदेशापर्यंत बंदच राहतील
१२. चित्रीकरण नियमित वेळेनुसार करण्यास परवानगी असेल.