कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे NEET PG परीक्षा अखेर रद्द
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाबाधितांची संख्या (COVID-19) दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरातील विविध परीक्षा रद्द केल्या जात आहे. नुकतंच राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET PG 2021) पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
येत्या 18 एप्रिलला NEET PG 2021 ही परीक्षा होणार होती. राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) ने 14 एप्रिलला NEET PG परीक्षेचे हॉलतिकीट (NEET PG 2021 Admit card) जारी केले होते. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. या परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पुढच्या तारखेची प्रतिक्षा आहे.
दरम्यान, ही परीक्षा पुढे ढकलावी यासाठी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर #postponeneetpg अशी मोहिम सुरु केली होती. अनेक विद्यार्थ्यांसह संघटनेने ही परीक्षा रद्द करावी, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे उमेदवारांच्या गटाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाला (NBE) पत्र लिहिलं होतं. यात त्यांनी परीक्षा पुढे ढकलावी, असे यात नमूद करण्यात आले होते. या सर्वानंतर NBE ने NEET PG च्या परीक्षेसाठी हॉलतिकीट जारी केले होते. ही परीक्षा रद्द करावी, यासाठी काही विद्यार्थी कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यताही वर्तवली जात होती. मात्र आता वाढत्या कोरोनामुळे ही परीक्षा रद्द केली होती. नीट पीजीच्या परीक्षेसाठी केवळ तीन दिवस शिल्लक असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेत 2 लाखाहून अधिक वैद्यकीय विद्यार्थी सहभागी होणार होते. आता ही परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.