नव्या कोरोना विषाणूंवर मात करण्यासाठी बूस्टर डोसची गरज : डॉ. गुलेरिया
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करुन आरोग्य विभाग रणनीती तयार करत आहे. अशातच एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोना लसीकरणाबाबत आणि कोरोनाच्या नव्या विषाणूंबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय. कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट येत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या या नव्या विषाणूंवर मात करण्यासाठी बूस्टर डोसची गरज पडेल, असं मत डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, भविष्यात कोरोनाच्या विषाणूचे आणखी व्हेरिएंट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताला कोविड लसीकरणासोबतच बूस्टर डोसची व्यवस्था करण्याची गरज आहे.
डॉ. गुलेरिया म्हणाले, जसजसा वेळ पुढे जाईल तसतशी रोगप्रतिकारक शक्ती कमी होईल. त्यामुळे नागरिकांना बूस्टर डोसची गरज लागेल. हा डोस भविष्यात येणाऱ्या नव्या कोरोना विषाणूंपासून संरक्षण करण्यासाठी उपयोगी पडेल. कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील लसींची रोगप्रतिकारक शक्ती अधिक असेल. या लसी आगामी काळात येणाऱ्या विषाणूंविरुद्ध लढण्यातही मदत करतील.
बूस्टर लसींच्या चाचणी आधीपासून सुरू आहे. एकदा संपूर्ण लोकसंख्येला पहिले दोन डोसचं लसीकरण पूर्ण झालं की त्यानंतर बूस्टर डोस देण्यासाठी पावलं उचलावी लागतील. हा बूस्टर डोस लस घेणाऱ्याला अधिक विषाणूंपासून संरक्षण देईल, असंही गुलेरिया यांनी नमूद केलं.
डॉ गुलेरिया यांनी लहान मुलांच्या लसीकरणावरही भाष्य केलं. सप्टेंबर २०२१ पर्यंत लहान मुलांच्या लसीकरणासाठी देखील लसी उपलब्ध होतील, अशी माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, “भारतात सप्टेंबरपर्यंत लहान मुलांचं लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास मोठी मदत होईल. मुलांसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची चाचणी सुरू आहे. सप्टेंबरपर्यंत त्याचा अहवाल येण्याची आशा आहे. फायजर लसीला याआधीच एफडीएकडून मंजुरी मिळालीय. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत लहान मुलांचं लसीकरण सुरू होईल.