Top Newsराजकारण

रोहित पवारांवर राष्ट्रवादीकडून ५ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी

मुंबई: आदरणीय शरद पवार यांच्या सूचनेनुसार प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर सोपवलीय. पक्षादेशानुसार, आगामी काळात या मतदारसंघात संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवे-जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने कामाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला जाईल आणि या विश्वासाच्या बळावरच आगामी सर्व निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्वास आहे, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुढील पिढी अजित पवार आणि यानंतर रोहित पवार अशी तिसरी पिढी राजकारण सक्रीय आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी रोहित पवार यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. यानंतर आता रोहित पवार यांच्यावर आजोबा शरद पवार यांनी नवीन जबाबदारी सोपवली आहे.

रोहित पवार तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. रोहित पवार यांचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये रोहित पवार यांनी एकतर्फी विजय मिळवला होता. त्यामुळेच रोहित पवार यांच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. नगरपंचायत निवडणुकीतील जबाबदारी यशस्वीरितीने पार पडल्यामुळे रोहित पवारांवरील विश्वास वाढल्याची चर्चा आहे. यातच रोहित पवार यांनी एक ट्विट करत यासंर्भातील माहिती दिली आहे.

दरम्यान, पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील १५ ते १७ महानगरपालिकाच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणूका आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप वेळ असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारी सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासाठीच भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी रोहित पवार यांच्याकडे दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button