सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादीच्या नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा पत्ता कट झाला आहे, तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची वर्णी लागली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर सोमवारी अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी निवडी झाल्या. भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीतर्फे वाईतील नितीन पाटील यांची नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. शिवेंद्रराजे भोसलेंकडे तीन वर्षांपासून अध्यक्षपदाची धुरा होती. चार दिवसांपूर्वी शिवेंद्रराजे यांनी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीगाठी घेत अध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली होती. सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी भेट घेत शिवेंद्रराजे भोसले यांनी बँकेत राजकारण नाही, तर सगळ्यांना सोबत घेऊन कारभार केला, असं शरद पवार यांना संगितलं होतं. यावेळीही अध्यक्षपद मिळावं, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवल्याचं बोललं जात होतं.
शरद पवारांनी देखील शिवेंद्रराजे भोसले यांनी ज्या पद्धतीनं बँकेचे चेअरमन म्हणून काम केलं त्याबद्दल कौतुक केलं होतं. जिल्हा बँकेत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना मानणाऱ्या संचालकांची संख्या देखील लक्षणीय आहे. त्यानुसार त्यांची अध्यक्षपदासाठी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र राष्ट्रवादीकडून बिनविरोध निवडून आलेल्या नितीन पाटील यांच्या पारड्यात पवारांनी मत टाकले. दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडीवेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले जिल्हा बँकेत उपस्थित होते.