रेमडेसिव्हीरवरून राष्ट्रवादीचा कृतघ्नपणा : भातखळकर

मुंबई : केंद्र सरकारने राज्यांना रेमडेसिव्हीरचं वाटप करताना राज्यातील सक्रीय रुग्णसंख्येचा विचार केला. त्यानुसार महाराष्ट्राला सर्वाधिक २ लाख ६९ हजार इंजेक्शन्स मिळाले आहेत. खरं तर रेमडेसिव्हीर प्राप्त करणं हे राज्याचं काम. पण तरीदेखील केंद्राने महाराष्ट्राला सर्वाधिक इंजेक्शन्स दिले. अशावेळी केंद्रावर टीका करणे म्हणजे केवळ कृतघ्नपणा आणि राजकारण असल्याची टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलीय.
त्याचबरोबर ‘ठाकरे सरकारचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात महाराष्ट्राला ५० हजार रेमडेसिव्हीर हवे आहेत, आव्हाड म्हणतात ७० हजार आणि बोरूबहाद्दर संजय राऊत म्हणतात ८० हजार. मनाला येईल ते प्रत्येक जण बोलतोय. अहो, बोलण्यापूर्वी एकदा ठरवा तर की कोणता आकडा सांगायचाय ते’, असा टोलाही भातखळर यांनी लगावलाय.
केशव उपाध्ये यांचे ट्विट
दरम्यान, राज्य सरकारची रेमडेसीव्हरची मागणीच मुळात २६ हजार होती आणि केंद्र सरकार त्याप्रमाणे देत आहे, पण राज्य सरकारमधील नेते आपले अपयश लपविण्यासाठी केंद्र सरकारवर आरोप करत आहेत. राज्याला ५० हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन हवी असताना दिली फक्त २६ हजार, असा कांगावा करणे म्हणजे आपले अपयश लपविण्यासाठी दुसऱ्याला दोष देण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे दिली आहे.