लॉकडाऊनवरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मतभेद

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक लॉकडाऊन लावण्याच्या दृष्टीने नियोजन करा, अशी सूचना केली आहे. यावर भाजपनंतर थेट सत्ताधारी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमधून लॉकडाऊनला जाहीर विरोध दर्शवण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. जनता आधीच लॉकडाऊनला कंटाळली आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावणे हा पर्याय नव्हे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. गोदिंयातील एका पत्रकार परिषेदत बोलताना त्यांबी याबाबत प्रतिक्रिया दिली. राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यामुळे अन्य पर्यायांचा विचार व्हायला हवा. जर लोकांनी नियम पाळले तर लॉकडाऊन टाळता येऊ शकतो, असेही पटेलांनी नमूद केले. यामुळे लॉकडाऊनबाबत राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका याबाबत दिसत आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याबद्दल आतापासूनच विरोध केला जात आहे. त्यामुळे आता या विषयावरुन नव्या वादाला तोंड फोडणार असे दिसत आहे.
लॉकडाऊनवर मतभेद नाहीत : टोपे
लॉकडाऊनवरुन कुठलाही मतभेद नाही. लॉकडाऊन कोणालाही सक्रिय नसतो मुख्यमंत्र्यांनाही लॉकडाउन करावा अशी इच्छा नाही. महाराष्ट्रात एकही व्यक्ती नाही की त्याला लॉकडाऊन पाहिजे आहेत. तहान लागल्यावर विहीर खणायची अशी म्हण आहे.आपण तशी तयारी करत आहोत. ती तयारी कशी आहे त्यावर लक्ष ठेवून आहोत, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. त्याचा विचार करायला हरकत नाही, मात्र गेल्यावेळेसारखा लॉकडाऊन परवडणारा नाही, असंही ते म्हणाले.
नवाब मलिकांचाही लॉकडाऊनला विरोध
तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही काल लॉकडाऊनला विरोध केला होता. राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनचा विचार आला आहे. पण लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. तसा आग्रहच आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आला आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितलं.
लॉकडाऊन हा राज्याला परवडणारा नाही. जनतेलाही परवडणारा नाही. त्यामुळे पर्याय होऊ शकत नाही. त्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यात यावा अशी आमची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनीही प्रशासनाला आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना केल्या आहेत. लोकांनी अजून काळजी घेतली पाहिजे. नियम पाळल्यास कोरोना वाढणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.