Top Newsराजकारण

जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर; शिवसेनेचे श्याम सोनवणे उपाध्यक्ष

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्या गळ्यात अखेर जळगाव जिल्ह‍ा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची माळ पडली आहे. तर, शिवसेनेला उपाध्यक्षपद देण्यात आलं असून श्याम सोनवणे हे उपाध्यक्ष होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी चेअरमनपदासाठी गुलाबराव देवकर यांना तर शिवसेनेकडून उपाध्यक्षपदासाठी श्याम सोनवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तब्बल एक ते दीड महिन्यांपासून जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. आज जिल्हा बँकेत पहिल्या तीन वर्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी गुलाबराव देवकर यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेनं श्याम सोनवणे यांची निवड केलीय.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ जागांपैकी २० जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली होती. यानंतर काल शुक्रवारी अजिंठा विश्रामगृहात महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीत अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी फॉर्म्युला ठरविण्यात आला होता. यात राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी उमेदवार ठरविण्याचा अधिकार वरिष्ठ पातळीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना देण्यात आले होते. तब्बल तासभर खडसे यांच्यासह संचालकांच्या झालेल्या बंद दाराआड बैठकीत पहिल्या तीन वर्षांसाठी अध्यक्षपदाची माळ गुलाबराव देवकर यांच्या गळ्यात पडली आहे. तर सेनेकडून पुढील दोन वर्षांसाठी उपाध्यक्षपदी श्याम सोनवणे राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्यासह इतर संचालक जिल्हा बँकेत दाखल झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्या तीन वर्षांसाठी अध्यक्षपदासाठी गुलाबराव देवकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. पुढील दोन वर्षांसाठी नवा अध्यक्ष निवडण्यात येईल.

घरकुल प्रकरणात धुळे न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याबाबत जिल्हा बँकेच्या संचालक निवडणुकीत गुलाबराव देवकर यांच्या निवडीवर टांगती तलवार होती. मात्र, धुळ्याच्या विशेष न्यायालयाने घरकुल प्रकरणात गुलाबराव देवकर यांना दिलेल्या शिक्षेस मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने व त्यांच्या जिल्हा बॅकेंच्या उमेदवारी अर्जावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याबाबत न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन याचिका फेटाळून लावल्याने गुलाबराव देवकरांना दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button