Top Newsराजकारण

गोव्यात राष्ट्रवादीचे १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, राष्ट्रवादीचाही उत्पल पर्रिकरांना पाठिंबा

पणजी/मुंबई : गोव्यात भाजपची कोंडी करण्यासाठी आणि भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी महाराष्ट्रातील दोन राजकीय पक्ष सध्या चांगलाच जोर लावत आहे. एकिकडून शिवसेनेने भाजपला घायळ करण्याचा डाव आखलाय, तर दुसरीकडून राष्ट्रवादीनेही रणशिंग फुंकले आहे. राष्ट्रवादीकडून गोव्यात किती उमेदवार लढार हे स्पष्ट झालं आहे. गोव्यामध्ये राष्ट्रवादीचे १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. शिवसेना नेते संजय राऊत तर गोव्यात ठाण मांडून बसताना दिसून येत आहेत. उत्पल पर्रीकरांना पाठिंबा जाहीर करून भाजपला चेकमेट देण्याचा डाव शिवसेनेने आधीच टाकला आहे. तर दुसरीकडून राष्ट्रवादीनेही लढाईची तयारी सुरू केली आहे.

पणजी मतदारसंघात उत्पल पर्रिकर यांना जनतेचा जोरदार पाठिंबा मिळत असून आमच्या पक्षाचा त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका गोव्याचे अध्यक्ष घेतील असेही नवाब मलिक यांनी सांगितले. त्यामुळे उत्पल पर्रिकरांना राष्ट्रवादी पाठिंबा देणार हे आता स्पष्ट झालं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं उत्पल पर्रिकरांची ताकद आणखी वाढली आहे. तसेच भाजपने पणजीतून दिलेला उमेदवार माफिया असल्याची टीका वारंवार करण्यात येत आहे. त्यामुळे त्याचाही फायदा उत्पल पर्रिकरांना होण्याची शक्यता आहे. दिवंगत नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांना गोव्यातील जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळत होता. त्यामुळेच देशपातळीवर मनोहर पर्रीकरांना मोठे स्थान देण्यात आले होते. आता पणजीतली जनता उत्पल पर्रिकरांच्याही पाठीमागे अशीच उभी राहणार का? याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.

उत्पल पर्रिकरांना ३-४ जागांची ऑफर दिली होती : प्रमोद सावंत

भाजपने माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल यांना पणजी मतदारसंघातून तिकीट नाकारलं. भाजपने विद्यमान आमदार अतानासिओ मोन्सेरात यांना उमेदवारी जाहीर केली. तर उत्पल पर्रिकर यांनीही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. अशा स्थितीत पणजीची जागेने भाजपपुढे उत्पल पर्रिकर यांचं आव्हान उभं केलं आहे. दरम्यान, उत्पल पर्रिकरांविषयी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोठं विधान केलं आहे. उत्पल पर्रिकर यांना ३-४ जागांची ऑफर देण्यात आली होती, त्यांनी एक जागा निवडायला हवी होती. आमच्या पक्षाच्या सर्वच नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यांना ज्या ३-४ जागांची ऑफर दिली होती, त्यांनी त्या जागेवर निवडणूक लढवायला हवी होती. जर त्यांनी निवडणूक लढवली असती तर ते मोठे नेते बनू शकले असते. ते पणजीच्या जागेवरून निवडणूक लढण्यासाठी का आग्रही होते, यात त्यांचे काय वैयक्तिक विचार होते याची मला कल्पना नाही, असं सावंत म्हणाले.

यावेळी त्यांनी मॉन्सेरात यांच्यावरही भाष्य केलं. त्यांच्यावर अनेक केसेस आहेत, यासंदर्भात सावंत यांना प्रश्न विचारण्यात आला. ते मनोहर पर्रिकर यांच्या सरकारमध्येही मंत्री होते. २००२ मध्येही सरकारात ते मंत्री होते. पणजीच्या जागेवर त्यांची चांगली पकड आहे आणि ते यावेळीही निवडणूक जिंकतील, असं त्यांनी नमूद केलं.

भाजपनं गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या २५ टक्के उमेदवारांना उमेदवारी दिल्याचा प्रश्न सावंत यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, आम्ही पोटनिवडणुकीत स्वच्छ प्रतिमा असलेल्यांना तिकीट दिलं होतं. परंतु त्यांना लोकांनी निवडून दिलं नाही. ट्रॅक रेकॉर्ड असल्यानं कोणी गुंड होत नाही. आता ते सुधरले असतील. तुम्ही पणजीच्या सामान्य जनतेला विचारून पाहा. ते लोकांच्यामध्ये कायम वावरतात. आपल्या लोकांसाठी कामं करतात. ते मोठ्या फरकानं जिंकून येतील. केस असल्याचा अर्थ ते गुन्हेगार आहेत असा होत नाही. प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

भाजपला धक्के पे धक्का! उत्पल पर्रिकरांची आता सुभाष वेलिंगकरांचाही पाठिंबा

दिवंगत मनोहर पर्रिकर यांनी पणजी मतदारसंघात पहिल्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेले प्रा. सुभाष वेलिंगकर यांची उत्पल पर्रिकर यांनी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. उत्पल यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.

वेलिंगकर यांचे पुत्र शैलेंद्र यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज भरला होता. तो मागे घेत त्यांनी याआधीच उत्पल यांना पाठिंबा दिलेला आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत सुभाष वेलिंगकर हे गोवा सुरक्षा मंचच्या तिकिटावर रिंगणात होते. परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यावेळी ते निवडणूक रिंगणातून बाहेर आहेत. उत्पल पर्रिकर यांनी काँग्रेस व आप वगळता भाजपविरोधी प्रत्येक घटकाकडून पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न चालवला आहे. काँग्रेसने तिकीट नाकारल्याने बंडखोरी केलेले माजी महापौर उदय मडकईकर यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

गोवेकर जनतेला केवळ काँग्रेसच न्याय देऊ शकते : नाना पटोले

जनतेला न्याय केवळ काॅंग्रेस सरकारच देऊ शकते. काॅंग्रेसच गोव्याचा विकास करु शकते, असा विश्वास महाराष्ट्र काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांंनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण साखळी भागाचा दौरा केला. यावेळी मुख्यमंत्री तथा भाजपचे साखळीचे उमेदवार डॉ. प्रमोद सावंंत यांंच्याविरोधात जनतेमध्ये बरेच विरोधी वातावरण दिसून येते. यावरुन काॅंग्रेसवर असलेला जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट होते, असे त्यांंनी सांगितले.

पटोले म्हणाले की, खाणी बंंद झाल्याने खाण अवलंंबितांंवर उपासमारीची वेळ आली आहे. कर्ज फेडण्यासाठी त्यांंना आपले दागिने गहाण ठेवावे लागले. मात्र, खाणी सुरु करण्यासाठी झालेल्या अपुऱ्या प्रयत्नांंमुळे जनतेला खाण बंदीच्या माध्यमातून भाजप सरकारचा खरा चेहरा दिसून आला.

ज्या पर्यटनासाठी गोवा ओळखला जायचा, त्याच पर्यटनाला आता फटका बसला आहे तर दुसरीकडे पर्यावरणाचासुध्दा ऱ्हास झाला आहे. गोवा सध्या बेरोजगारीसाठी अधिक ओळखला जात असल्याची टीका त्यांंनी केली.

गोव्यात निवडणुकीच्या रिंगणात विविध पक्ष उतरले असले तरी काॅंग्रेसच महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. काॅंग्रेसच जनतेला न्याय देऊ शकते व गोव्याचा विकास करु शकते. अन्य पक्ष केवळ काॅंग्रेसच्या मतांंचे विभाजन करण्यासाठी आल्याचे स्पष्ट होते. राज्यातील असो किंवा केंंद्रातील सरकार असो त्यांंनी काय काम केले, हे जनतेच्या समोर आहे.

केंद्रातील भाजप सरकारने केवळ लोकशाही ढासळण्याचे तसेच अभिव्यक्ती स्वातंंत्र्यावर गदा आणण्याचे काम केले, असा आरोप पटोले यांंनी केला. यावेळी काॅंग्रेस नेते तौफिक मुल्लानी, श्रीनिवास खलप, सुनील कवठणकर व अन्य नेते उपस्थित होते.

गोव्यातील खरी लढत आम आदमी पक्ष आणि भाजपमध्येच; केजरीवालांचा दावा

आता दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गोवा निवडणुकीतील थेट लढत आम आदमी पक्ष आणि भाजप या दोन पक्षात असल्याचा मोठा दावा केला आहे.

केजरीवाल यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसच्या सत्ताधारी पक्षात सामील होण्याचा ट्रेंड पाहता गोव्यात त्याला मत देणे म्हणजे भाजपला “अप्रत्यक्ष मत” देण्यासारखे आहे. त्यामुळे गोव्यातील लढत आप आणि भाजप यांच्यात आहे, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

गोव्यातील जनतेला आप आणि भाजपमध्ये एक पर्याय आहे. जर तुम्हाला स्वच्छ, प्रामाणिक सरकार हवे असेल, तर तुम्ही ‘आप’ला मत देऊ शकता. दुसरा पर्याय म्हणजे भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मतदान करणे. अप्रत्यक्ष मतदान म्हणजे जेव्हा तुम्ही काँग्रेसला मत देता तेव्हा ते अप्रत्यक्षपणे मतदान करता, तो काँग्रेसचा माणूस जिंकेल आणि भाजपमध्ये जाईल, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

दरम्यान, आम आदमी पक्षाच्या सर्व ४० उमेदवारांनी कायदेशीररित्या लागू करण्यायोग्य निष्ठा प्रतिज्ञावर स्वाक्षरी केली, निवडून आल्यास दोष न देण्याचे आणि स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचे वचन दिले. आमचे सर्व उमेदवार प्रामाणिक आहेत, परंतु हे उमेदवार प्रामाणिक आहेत याची मतदारांना खात्री देण्यासाठी हे शपथपत्र आवश्यक आहे, असे केजरीवाल म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button