मुंबई : ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका करणारे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे नव्या वादात सापडले आहेत. त्यांचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर ३० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे खासदार असताना गांधींची हत्या करणाऱ्या गोडसे यांचे समर्थन करणारी भूमिका तुम्ही कशी करू शकता, असा सवाल त्यांना विचारला जाऊ लागला आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल कोल्हे यांना पाठिंबा देण्यात आला असून, त्यांनी केलेल्या नथुराम गोडसे भूमिकेला आमचा विरोध नाही, असे राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी याविषयीची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. राष्ट्रवादी हा संविधानाचा सन्मान करणारा पक्ष आहे. या संविधानाने दिलेले अधिकार प्रत्येकाला आहेत आणि कर्तव्यही प्रत्येकासाठीच आहेत. त्यानुसार अमोल कोल्हे कलाकार म्हणून नथुराम गोडसेची भूमिका साकारत असतील तर त्याला आमचा विरोध नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारण्याला आमचा विरोध नाही. अमोल कोल्हे यांची कलेशी बांधिलकी आहे. त्यानुसार ते ही भूमिका साकारत आहेत. परंतु त्यांची वैचारिक बांधिलकी ही राष्ट्रवादी पक्षाच्या वैचारिक भूमिकेशीच आहे, याबाबत आमच्या मनात कोणताही संशय नाही. शरद पोंक्षे नथुराम गोडसेची भूमिका त्या विचारांच्या प्रचारासाठी साकारतात तर, अमोल कोल्हे कलाकार म्हणून कलेशी असलेल्या बांधिलकीतून ही भूमिका साकारताहेत, हा त्यातील मुलभूत फरक आहे, असे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेंची भूमिका करण्याला राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. अमोल कोल्हे यांनी जरी कलाकार म्हणून ही भूमिका साकारली असली, तरी त्यात गोडसेचे समर्थन आलेच. आणि गोडसेंच्या कृतीचे, गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही. माझा अमोल कोल्हेंच्या गोडसेची भूमिका साकारण्याला विरोध आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
शरद पवारांकडून अमोल कोल्हेंचे थेट समर्थन
राष्ट्रवादीचे नेते खा. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आहे. यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांसह अनेकांनी कोल्हे यांचा निषेध केला आहे. अशात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र कोल्हे यांना थेट समर्थन दिलं आहे. पवार यांनी आज म्हटलं की, गांधी सिनेमा सगळ्या जगात गाजला. त्या सिनेमात सुद्धा नथुराम गोडसेची भूमिका होती. नथुराम गोडसेची भूमिका केली तो कलाकार होता. कलाकार म्हणून कोल्हेंच्या या भूमिकेकडे पाहिलं पाहिजे, असं पवार म्हणाले. विशेष म्हणजे कोल्हे यांच्या या चित्रपटाचा मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी निषेध केला आहे.
दरम्यान पवार यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत जो औरंगजेबाची भूमिका करतो. त्यात तो मुघलांचा समर्थक होत नाही किंवा राम -रावणाच्या भूमिकेत रावणाची भूमिका करणाऱ्याने सीतेचं अपहरण केलं असं होत नाही, असं ते म्हणाले. अमोल कोल्हेंनी जी भूमिका केली ती कलावंत म्हणून केली, मला माहिती आहे, अमोल कोल्हे यांनी ज्यावेळी भूमिका केली, त्यावेळी ते आमच्या पक्षातही केली, त्यांनी कलावंत म्हणून भूमिका केली म्हणजे त्यांनी गांधींविरोधात भूमिका आहे, असा त्याचा अर्थ नाही. किंवा नथुराम गोडसेने जे काय काम केलं, त्याबद्दल सारा देश जाणून आहे, असं पवार म्हणाले.
भाजपकडून याबाबत होत असलेल्या टीकेवर बोलताना पवार म्हणाले की, भाजप हे गांधीवादी कधीपासून झाले? भाजपच्या संघ आणि त्यांचा इतिहास सर्वांना माहिती आहे. एक काळ असा होता की गांधींबाबत वेगळी भूमिका घेणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या शक्ती सध्या कुठे आहेत बघितलं पाहिजे, त्यावर त्यांनी बोलावं. कलावंत म्हणून मी कोणत्याही कलाकाराचा सन्मान करतो, असंही पवार म्हणाले.