बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर ‘बंटी-बबली’ : रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल
मुंबई : राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन अनेकविध मुद्द्यांवरून चांगलेच गाजले. विधानसभेत गोंधळ घालत राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यावरून कारवाईचा देण्यात आलेला आदेश हाही मुद्दा चांगलाच चर्चेत आला. आता यावरून राष्ट्रवादीकडून खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
कालच संस्थगित झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच असल्याचे पाहायला मिळाले आहे. आमदार रवी राणा यांनी शेतकरी मुद्द्यावरुन विधानसभेमध्ये गोंधळ घालत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना तालिका अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधव यांनी सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश मार्शल्सला दिले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.
बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले, या शब्दांत नवनीत राणा आणि रवी राणा यांचे नाव न घेता रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. अलीकडेच अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द करत दोन लाखांचा दंड ठोठावला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. तसेच न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावल्या.